Goa University: ‘पोस्ट ग्रॅजुएशन'ची अंतिम परीक्षा ऑफलाईन घेण्यास विरोध

Goa University: ‘पोस्ट ग्रॅजुएशन'ची अंतिम परीक्षा ऑफलाईन घेण्यास विरोध
university of goa.jpg

पणजी: गोवा विद्यापीठाने आपल्या व संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे जाहीर केले असून त्याला विरोध होऊ लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. गोवा विद्यापीठाकडे संपर्क साधला असता मिळालेल्या माहितीनुसार, पदव्युत्तर परीक्षा देणार असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दीड हजार आहे. (ABVP opposes taking post graduation final exam offline)

केंद्र व राज्य सरकारने तसेच अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून कोरोना महामारीचा फैलाव भरपूर कमी झालेला आहे. पण अजूनही परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नसून अशा परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेणे हे हानीकारक ठरू शकते, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या गोवा शाखेने म्हटले आहे.

गोवा विद्यापीठाने परिपत्रक जारी करून 1 जुलैपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीमुळे दुसऱ्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या आणि विद्यार्थ्यांचे मूल्यांकन ऑफलाईन पद्धतीने झालेल्या ‘आयएसए’च्या आधारे झाले होते. तो ऑफलाईन प्रयत्न गणला जावा. इतर सर्व सत्राच्या अखेरीस घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने झाल्या होत्या. त्यामुळे सध्याची सत्राच्या अखेरीस होणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास अनुमती देता येते, असे अभाविपने म्हटले आहे.

त्याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविणारी महाविद्यालये राज्यभरात कमी प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी बरेच अंतर कापावे लागेल. सध्याच्या परिस्थितीत ते विद्यार्थ्यांना कठीण ठरेल. कारण राज्यातील सार्वजनिक वाहतूक मर्यादित आहे. त्यातच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे अनेक विद्यार्थी सध्या राज्याबाहेर असून कर्फ्यू अजून समाप्त झालेला नसल्याने त्यांना राज्यात परत प्रवेश करणे कठीण होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेऊ नयेत आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासंदर्भात संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने सादर केलेल्या सूचनांचा विचार करावा, अशी मागणी अभाविपने केलेली आहे.

गोवा विद्यापीठाने जाहीर केल्यानुसार, एमए, एमकॉम, एमएस्सी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी चौथ्या सत्राची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच तिसऱ्या सत्राच्या परीक्षेला पुन्हा बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. ज्यांनी प्रबंध सादर करायचा आहे त्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पीडीएफ स्वरूपात तो सादर करण्याची मुभा देण्यात आलेली असून त्याची मार्गदर्शकाकडून स्वतंत्ररीत्या पडताळणी करण्यात येईल आणि 40 टक्के गुण त्यावर आधारित असतील. तर बाकीच्या 60 टक्के गुणांसाठी आपला प्रोजेक्ट ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com