गोव्यातील शैक्षणिक वर्षाला होणार १ सप्टेंबरपासून सुरुवात

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 11 जून 2021

गोवा सरकारने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गोवा सुरक्षा मंचच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात आले आहे.

पणजी : कोरोना (Corona) महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर गोवा विद्यापीठाने (University of Goa) संलग्न महाविद्यालयांसाठीचे शैक्षणिक कॅलेंडर बदलले असून, त्यानुसार आता विद्यापीठाचे २०२१-२२ चे नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून (September) सुरू होणार आहे. यापूर्वी जारी केलेल्या निर्देशानुसार, नवे शैक्षणिक वर्ष (New Academic Year) १० ऑगस्टपासून सुरू होणार होते.

महामारीची दुसरी लाट तीव्रपणे उसळून कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर गोवा विद्यापीठाला २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुट्टी ११ मेपासून ७ जूनपर्यंत घोषित करावी लागली होती. या सुट्टीच्या काळात महामारीचा प्रभाव बघून विद्यार्थ्यांना ताणापासून मुक्त ठेवण्यासाठी ऑनलाइन वर्गही स्थगित करण्यात आले होते. गोवा विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ आता आधी केलेल्या नियोजनापेक्षा जवळपास एका महिन्याने लांबणीवर पडला आहे. दुसरी लाट येण्यापूर्वी जानेवारी महिन्यात गोवा विद्यापीठाने दुसऱ्या सत्राची परीक्षा जूनमध्ये घेण्याचे आणि जुलैमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याचे ठरविले होते.

Goa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर

१६ ते ३१ ऑगस्ट उन्हाळी सुट्टी...
गोवा विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बीए, बीकॉम, बीएस्सी यासारख्या अभ्यासक्रमांचे २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र ३ जुलै रोजी संपेल. त्यानंतर सत्राच्या अखेरीस घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ९ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत घेतल्या जातील. विद्यार्थी १६ ते ३१ ऑगस्टदरम्यान उन्हाळी सुट्टीच्या दुसऱ्या भागाचा आनंद घेऊ शकतील. त्यानंतर सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा, सरकारचा निर्णय स्तुत्य’
गोवा सरकारने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल गोवा सुरक्षा मंचच्या वतीने सरकारचे अभिनंदन करण्यात आले आहे. गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. फळदेसाई म्हणाले, आपत्तीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आपले मत असल्याचे सांगून  राज्यात आतापर्यंत सर्व शिक्षणाची योग्य सोय आहे. परंतु स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन गोमंतकीय विद्यार्थ्यांना मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले स्वप्न सत्यात उतरवता येत नव्हते. या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने विद्यार्थ्यांना आठवीपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी सुरूवात करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या