इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पाला गती

प्रतिनिधी
रविवार, 16 ऑगस्ट 2020

तुये (पेडणे) येथील प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पणजी:  तुये (पेडणे) येथील प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्यटन भवनात आज बैठक घेऊन या प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महिनाभराने पुन्हा बैठकीचे आयोजन करण्याचेही आज ठरवण्यात आले आहे.

या प्रकल्पाला येत्या मार्च २०२१ पर्यंत केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. माहिती तंत्रज्ञानमंत्री जेनिफर मोन्सेरात, माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष नीळकंठ हळर्णकर, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आदी या बैठकीत सहभागी झाले होते.  वीज उपकेंद्र, प्रशासकीय इमारत, पाणी पुरवठा, अग्नीशमन केंद्र,  रस्ता जमीन भूसंपादनाच्या संदर्भात अंदाजित कालावधीवर  चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेवर होईल हे सुनिश्चित करण्यासाठी एका महिन्याच्या कालावधीत प्रकल्पाचे पुनरावलोकन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

माहिती तंत्रज्ञान खाते या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक आहे तर माहिती तंत्रज्ञान महामंडळ  अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. या जागेवर उत्पादन क्षेत्रातील आगामी घटकांसाठी विविध विकास भूखंड - औद्योगिक भूखंड आणि मायक्रो औद्योगिक भूखंड असतील. सध्या अंतर्गत रस्त्याचे काम जवळपास ८५ टक्के पूर्ण झाले आहे. जमीन वाटप धोरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर आहे. व्यवस्थापनाच्या उद्देशाने एक स्वतंत्र कंपनी तयार करणे अनिवार्य आहे आणि त्याच्या स्थापनेस मान्यता देखील या महिन्याच्या आत अपेक्षित आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

आतापर्यंत झालेली प्रकल्पाची प्रगती लक्षात घेत केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचा दुसरा हप्ता लवकरच येणार आहे. पथदीप आणि प्रशासकीय इमारतसंदर्भात इतर निविदांच्या स्थितीविषयी चर्चा करण्यात आली.

संबंधित बातम्या