"शाळेत केवळ पोपट पंचीचे शिक्षण देऊन चालणार नाही"

दैनिक गोमन्तक
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

गेले आठ महिने जनता कोरोनाच्या संकटात सापडलेली आहे. याचा शैक्षणिक क्षेत्रावरही बराच परिणाम दिसून आला. या काळात ऑनलाईन शिक्षण प्रणाली वापरली जात आहे.

वाळपई:  गेले आठ महिने जनता कोरोनाच्या संकटात सापडलेली आहे. याचा शैक्षणिक क्षेत्रावरही बराच परिणाम दिसून आला. या काळात ऑनलाईन शिक्षण प्रणाली वापरली जात आहे. म्हणजेच माणसाला त्या त्या परिस्थितीनुसार बदलावेच लागत आहे. शाळेत केवळ पोपट पंचीचे शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यापलिकडेही जाऊन नवीन सुविधांचा वापरही तेवढाच गरजेचा आहे, एसीजीएल कंपनीला देखील या कोरोनामुळे नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. म्हणून कंपनीतर्फे उद्योग व्यवसायाबरोबरच शिक्षण, पर्यावरण व साधनसुविधेवर भर देण्यात येत आहे, एसीजीएल कंपनीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी केले आहे.

वाळपई वेळूस येथील श्री हनुमान माध्यमिक विद्यालयात ऑटोमोबाईल कार्पोरेशन भुईपाल होंडातर्फे (एसीजीएल) सीएसआर प्रकल्पा अंतर्गत बांधलेल्या अत्याधुनिक संगणक कक्षाच्या उद्‍घाटनप्रसंगी धेंपो बोलत होते. यावेळी एसीजीएल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अजय, अनिल कुमार शर्मा, प्रकाश नाईक, राघवेंद्र सिंग बुटोला, जितेंद्र नाटेकर, हनुमान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मीनल काणेकर, वाळपई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रेमानंद दलाल आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होते.

श्रीनिवास धेंपो म्हणाले, कोरोनाच्या सुरुवातीच्या लाटेत वाटले होते, की आता जग संपेल. पण हळूहळू त्यावर नियंत्रण येत गेले. उद्योग जगतात नुकसान होऊन रस्त्यावरून ट्रक जात नाही, माल जात नाही अशी गंभीर स्थिती निर्माण झाली. सामान्य कुटुंबावर आव्हानांचा डोंगर उभा राहिला. या काळात संगणक हाताळणीची माहीती होती म्हणून ओनलाईनद्वारे उद्योगात मजल मारता आली. म्हणूनच संगणक यांची सविस्तर व बदलती माहिती विद्यार्थांना झाली पाहिजे. देशाची प्रगती ही ग्रामीण भागाच्या सुधारणेवर अवलंबून आहे. शहरात जी सुविधा मिळते तीच सुविधा गावातील शाळांना मिळायला हवी. सरकार सदैव शिक्षणासाठी कटिबद्ध असतेच. पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा, वीज, रस्ते या पाच आवश्यक गोष्टी मानल्या जायच्या. आजच्या घडीला सहावी जोड म्हणून ''सुविधा'' ही आवश्यक बाब बनली आहे. त्यासाठी शाळेत अत्याधुनिक संगणक कक्षाची गरज आहे, असे धेंपो म्हणाले. 

अजय म्हणाले, संगणक जीवनातील महत्वाचा घटक बनला आहे. माहिती व त्यात सुधारणा झाली पाहिजे. लहानपणापासून संगणकाचे मुलांना शिक्षण दिले पाहिजे. कंपनी शालेय संस्थांसाठी आजपर्यंत योगदान देत आली आहेत. हनुमान शाळेला ही सुविधा देताना अतिशय आनंद होतो आहे.
डॉ. प्रेमानंद दलाल म्हणाले, भविष्यात सुविधायुक्त शिक्षण प्रणाली आवश्यक बनणार आहे. एसीजीएल कंपनीचे शैक्षणिक सामाजिक योगदान फार अभिनंदनीय बनले आहे. मुख्याध्यापिका सौ. मीनल काणेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कन्विक्षा माऊजेकर हिने केले. श्रीनिवास धेंपो यांनी फीत कापून आधुनिक संगणक कक्षाचे उद्‍घाटन केले. या नवीन संगणक कक्षात वीस संगणक कार्यान्वित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या