अच्युत उसगावकर यांचे निधन

Dainiik Gomantak
मंगळवार, 16 जून 2020

अच्युत उसगावकर यांच्या पार्थिवावर सांतिनेज येथील स्मशानभूमीत दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पणजी

 मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत काशिनाथ उसगावकर ( वय ९२ )यांचे मंगळवारी पणजी गोवा येथे निधन झाले. गोवा मुक्तीनंतर ते विधानसभेचे उपसभापती होते.  स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांनी दुसऱ्या वेळी स्थापन केलेल्या  मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते. 

मिरामार येथे ते अलीकडे राहत होते. वृद्धापकाळाने अलिकडे ते आजारी होते.  गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून १९६१ साली मुक्तता झाल्यानंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सत्तेत राहिला आणि १७ वर्षे तो पक्ष सत्तेत होता. उसगावकर यांनी मगो पक्षाचे आमदार व मंत्री म्हणून सत्तरच्या दशकात काम केले.  उसगावकर  यांचे आज पहाटे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता सांतिनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे तीन कन्या आहेत. 

अच्युत उसगावकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते. भाऊसाहेब बांदोडकर हे मुख्यमंत्री असताना ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी उपसभापतीपदही भूषवले होते. त्यानंतर १९६७ मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर ते बांदोडकर यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळातही ते १३ ऑगस्ट १९७७ ते २७ एप्रिल १९७९ या काळात मंत्री होते.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना उसगावकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी मिरामार येथे जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले आणि श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आपल्या शोक संदेशात उसगावकर यांची अत्यंत साधी राहणी, नम्र स्वभाव व दयाळु स्वभाव यामुळे त्यानी अनेक मित्र जोडले होते. त्यांच्या परिवाराशी माझा जवळचा सबंध होता असे नमूद केले आहे.

 

 

 

 

संबंधित बातम्या