विनामास्क प्रकरणी ५४९३ जणांविरुद्ध कारवाई

dainik gomantak
सोमवार, 11 मे 2020
विनामास्क प्रकरणी ५४९३ जणांविरुद्ध कारवाई

पणजी

‘कोविड-१९’च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सार्वजनिक ठिकाणी तोंडाला ‘मास्क’ लावण्याची सक्ती केली असली, तरीही काहीजण अजूनही त्याकडे दुर्लक्ष करून बेपर्वाईने वागत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात असून गेल्या दहा दिवसांत पोलिसांनी सुमारे ५४९३ लोकांविरुद्ध प्रत्येकी १०० रुपये दंड देऊन कारवाई केली आहे. उत्तर गोव्यात १८५७ तर दक्षिण गोव्यात ३६३६ लोकांचा या कारवाईत समावेश आहे.
सरकारे गेल्या ३० एप्रिलला आदेश काढून राज्यातील सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’ची सक्ती केली होती. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध ही कारवाई करण्यासाठी पोलिस हवालदार व त्यावरील पोलिस अधिकारी यांच्यासह पंचायत सचिव, तलाठी, पालिका निरीक्षकांना अधिकार देण्यात आले आहे. यापैकी फक्त पोलिसच कारवाई करण्यात सक्रिय आहेत. बाजारात किंवा दुकानात तोंडाला मास्क नाही, तर सामान दिले जात नाही. त्यामुळे लोक तात्पुरते मास्‍क लावतात व त्यानंतर वाहनावरून जाताना काहीजण काढतात. हे मास्क एका विशिष्ट प्रकारचे असायला हवे, तरी काहीजण सर्जरीसाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कवर बंदी असताना ते वापरतात. काहीजण रुमाल तोंडाला बांधतात, तर महिला आपली ओढणीच तोंडाला बांधून मास्क म्हणून वापर करतात. मास्क कोणत्या प्रकारचा असावा यावर काहीच मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या परीने व कोणत्याही कपड्याचे मास्क वापरत आहेत. हल्ली हे मास्क काही फिरते विक्रेतेही त्याची विक्री करू लागले आहेत.
‘कोविड - १९’ विरोधात लढा देताना या महामारी साथीचा प्रादुर्भाव किंवा प्रसार होऊ नये म्हणून सरकारने या ‘मास्क’ची सक्ती करून लोकांना या साथीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र लोक अजूनही या महामारीबाबत गंभीर नाहीत. गोवा ‘ग्रीन झोन’मध्ये आहे त्यामुळे आता गोव्यावरील संकट टळले आहे, असे गृहित लोक बिनधास्तपणे तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसतात.

अनोख्‍या पद्धतीने जनजागृती
जे लोक सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरून येत नाही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबरोबरच त्याच्या बदल्यात मास्क देण्याची पद्धत राबवायला हवी. त्यामुळे ज्याच्याकडे मास्क नाही किंवा त्याने वापरला नसेल तर त्वरित त्याला तिथल्या तिथेच वापरण्यास सक्ती करणे शक्य होईल. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई फक्त महसूल गोळा करण्यासाठी नव्हे, तर लोकांना कोरोना विषाणू साथीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आहे, असा संदेश लोकांमध्ये जाईल. मास्क न वापरल्याने दंडात्मक कारवाई करून लोकांची सतावणूक करणे हा यामागील उद्देश नाही, तर या महामारी साथीचा गंभीर परिणाम व मास्क न वापरल्याने त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही समज या दंडात्मक कारवाईतून देण्याचा उपक्रम सुरू व्हायला हवा, असे मत एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले.

 

संबंधित बातम्या

फोटो फीचर