भाजपविरोधात मतदान केलेल्यांवर कारवाई

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

फोंडा भाजप मंडळाचे स्पष्टीकरण, मगोचे यतीश सावकार भाजपमध्ये

फोंडा: विजय समोर असतानाही दोन नगरसेवकांनी गद्दारी केल्यामुळेच फोंडा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. ही गद्दारी केलेल्या दोघाही नगरसेवकांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे बोलणी सुरू असून भाजप नेत्यांच्या सूचनेनुसारच ही कारवाई केली जाईल, असे फोंडा पालिकेचे नगरसेवक तथा फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी सांगितले.

फोंडा पालिकेत आज (शनिवारी) घेतलेल्या या पत्रकार परिषदेला शांताराम कोलवेकर तसेच नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी व नगरसेवक यतीश सावकार उपस्थित होते. शांताराम कोलवेकर म्हणाले, की काल (शुक्रवारी) उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मगो समर्थक नगरसेविका अमिना नाईक यांना भाजपच्या दोन नगरसेवकांनी मतदान केले आहे. 

मगो समर्थक नगरसेवक यतीश सावकार हे भाजपसोबत असून नऊ मते भाजप उमेदवार आनंद नाईक यांना पडणार असे गृहित धरण्यात आले होते, तर मगो समर्थक नगरसेविका अमिना नाईक यांना सहा मते पडतील असे स्पष्ट झालेले असताना भाजपच्या दोन नगरसेवकांनी विरोधात मतदान केले. त्यामुळेच भाजपमध्ये राहून मगो पक्षाला समर्थन देणाऱ्या दोघा नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

दरम्यान, मगो समर्थक नगरसेवक यतीश सावकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्याची पूर्वतयारी म्हणूनच त्यांनी भाजप उमेदवाराला समर्थन दिले होते, अशी माहिती शांताराम कोलवेकर यांनी यावेळी दिली. 

यतीश सावकार यांनी यासंबंधी आपले मत व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाकडून देशात आणि राज्यात विकासात्मक कार्य होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कार्य आपल्याला आवडले. त्यातच आपल्या प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यासंबंधी भाजपकडून कार्यवाही होत असल्याने आपण भाजप प्रवेश करीत असल्याचे यतीश सावकार यांनी पत्रकारांना सांगितले. 

बिहारमध्ये दीड हजार नवे रुग्ण
पाटणा: बिहारमध्ये गेल्या चोवीस तासात १,४५७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या १४,९६३ वर पोचली आहे. सर्वाधिक पाटण्यात २५५ जण आढळून आले आहेत. राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९१.६१ टक्के आहे.

काश्‍मीरमध्ये भूकंपाचा धक्का
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमध्ये शनिवारी दुपारी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर ४.५ इतकी होती. दुपारी १२ च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याचे भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

हिमाचलच्या आणखी एका आमदारास लागण
सिमला : हिमाचल प्रदेशचे रोहरू मतदारसंघाचे आमदार लाल ब्राकता यांना कोरोनाची लागण झाली असून ते पॉझिटिव्ह आमदारांची संख्या आता ८ झाली आहे.     

संबंधित बातम्या