पणजी मार्केटमधील व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई

प्रतिनिधी
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

महापालिका कर्मचारी तसेच पोलिस संरक्षणात मार्केटमधील व्यापाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईमुळे विक्रेत्यांची माल हटविण्यासाठी धावपळ झाली. यावेळी मार्केट समितीने या कारवाईला विरोध केला.

पणजी - पणजी मार्केट संकुलातील तळमजल्यावरील सोपो विक्रेत्यांना निश्‍चित केलेल्या उंचीपर्यंत माल ठेवण्यास निर्देश देऊनही त्याचे उल्लंघन केले जात असल्याने  पणजी महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांनी महापालिका कर्मचारी तसेच पोलिस संरक्षणात मार्केटमधील व्यापाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली. या कारवाईमुळे विक्रेत्यांची माल हटविण्यासाठी धावपळ झाली. यावेळी मार्केट समितीने या कारवाईला विरोध केला. मात्र, आयुक्तांनी ही कारवाई सुरूच ठेवली. 

देशवासीयांची प्रतीक्षा लवकरच पूर्ण; सरसंघचालक मोहन भागवत

या मार्केट संकुलात सोपो विक्रेत्यांनी त्यांना दिलेल्या परवान्याचे उल्लंघन करून लाकडी खोक्यांचा वापर करत सामान रचून ठेवले होते. ही उंची वाढल्याने काही दिवसांपूर्वी पणजी महापालिकेने कारवाई केली होती व हे सामान हटविण्याचे संकेत दिले होते. त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला होता. मात्र, हे सामान न हटविल्याने आयुक्तांनी आज सकाळपासूनच कारवाई सुरू केली. अनेक भाजी व फळ विक्रेत्यांनी सामानाची उंची वाढविली होती. त्यांना दिलेल्या प्लॅटफॉर्मवर सामान मांडून विक्री करण्यास परवानगी असताना तेथे लाकडी बॉक्स थाटून एखाद्या दुकानाप्रमाणे त्याची मांडणी केली होती. यामध्ये बहुतेक परप्रांतीय असून त्याच्या बाजूला असलेल्या  स्थानिक गोमंतकीय विक्रेत्यांवर अन्याय होत होता. सर्वांना एकच नियम याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली. ही कारवाईची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती आयुक्त रॉड्रिग्ज यांनी दिली. 

१०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय - दीपक पाऊसकर

मार्केटमध्ये कारवाईला सुरवात झाल्यावर सोपो विक्रेते एकत्र झाले व या कारवाईला विरोध केला. मात्र आयुक्तांनी कोणाचेही ऐकून न घेता महापालिका कर्मचारी व मजदूर तसेच पोलिस संरक्षणात कारवाई सुरूच ठेवली. त्यांनी कारवाईचे निर्देश दिल्यानंतर तेथून निघून गेल्यावर विक्रेते आक्रमक बनले. त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सामान हटविण्यास विरोध केला. यावेळी मार्केट समितीचे अध्यक्ष राजेंद्र धामस्कर व पदाधिकारी मार्केटमध्ये दाखल झाले. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून सोपो विक्रेत्यांनी त्यांचा माल विक्रीसाठी ठेवताना उंचीवर ठेवला आहे. फुलविक्रेत्यांनी फुलांच्या माळा टांगून ठेवण्यासाठी लाकडी स्टँड केले आहेत. ही पर्यायी व्यवस्था पंधरा वर्षापूर्वी महापालिकेच्या संमतीनेच करण्यात आली होती. त्यामुळे त्यामध्ये गैर काय असा सवाल केला. या कारवाईमुळे मार्केटमध्ये गोंधळ उडाला होता. मार्केटात आलेल्या ग्राहकांना सामान खरेदी करण्यासही अडचणी आल्या. कारण अनेकांनी आपला व्यापार बंद ठेवला होता. 

पणजी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धामस्‍कर यांनी महापालिकेने कारवाईच्या नावाखाली सोपो विक्रेत्यांची गेल्या काही दिवसांपासून नियमांचा बडगा दाखवून सतावणूक सुरू केली असल्याचा आरोप करत सांगितले की, पणजी मार्केटमध्ये ही सतावणूक महापालिका अधिकाऱ्यांकडून सुरू आहे व इतर शहरातील मार्केटमध्ये अशाप्रकारे सतावणूक होत नाही. सोपो विक्रेत्यांना त्यांचा माल प्लॅटफॉर्मवर ठेवण्यासाठी असलेली जागा अपुरी असल्याने व माल ग्राहकांच्या दृष्टीस पडावा यासाठी त्याला उंची देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी महापालिकेने ही उंची कमी करण्यास सांगितल्याप्रमाणे काही सोपो विक्रेत्यांनी ती केली होती तरीही आज कारवाई करण्यात आल्याचे धामस्कर म्हणाले. 

महामार्ग विस्‍तारीकरणात पिलार, जुने गोवेतील घरांना धोका टळला

पणजी महापालिकेची ही कारवाई मार्केटमध्ये असलेल्या सामान्य विक्रेत्यांविरुद्धचा अन्याय आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याकडे चर्चा करण्यात येणार आहे. सोपो विक्रेत्यांना असलेल्या जागेत व्यापार करणे शक्य नसल्याने काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मार्केट सुरू झाल्यापासून सामान ठेवलेल्या उंचीला कधी हरकत घेतली गेली नव्हती. मात्र, गेल्या एक महिन्यापासून हे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेण्यात येणार असल्याचे धामस्कर म्हणाले.

पणजी मार्केटातील सोपो विक्रेत्यांविरुद्ध आज करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात मला काहीच माहीत नाही. त्याची कल्पना मला आयुक्तांनी दिलेली नव्हती. मला सकाळपासून मार्केट समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून फोन येत होते. या कारवाईशी माझा संबंध नाही तर आयुक्तांनी ती केली आहे.
- उदय मडकईकर, महापौर

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोपो विक्रेत्यांना अनेकदा सांगूनही त्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यास चालढकलपणा चालविला होता. त्यामुळे महापालिकेने आज ही धडक कारवाई सुरू केली. सामानाची उंची वाढवून इतर विक्रेत्यांवर अन्याय करत आहेत. लाकडी बॉक्सचा आधार घेऊन ही उंची वाढविली आहे. अन्न व औषध प्रशासनानेही अस्वच्छतेबाबत महापालिकेला ताकीद दिलेली आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यावाचून पर्याय नाही.
- संजीत रॉड्रिग्ज, महापालिका आयुक्त

संबंधित बातम्या