बेकायदा रेती उपसाप्रकरणी सावर्डेत छापा

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

सांगे उपजिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधितावर कारवाईचे आदेश

कुडचडे: सावर्डे व कापशे या जुवारी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती काढण्यास सुरुवात झाल्यामुळे पर्यावरणीय धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा त्या संदर्भात तक्रारी करूनही त्यावर कारवाई करण्यात संबंधित यंत्रणा कोणतीच पावले उचलत नसल्याने शेवटी सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांच्यापर्यंत लेखी तक्रारी पोचल्याने त्यांनी या ठिकाणी छापा मारून संबंधितावर कारवाई करण्याचे आदेशही दिले.

सावर्डेतील जुवारी नदीत सुमारे ५० च्या आसपास रेती व्यवसायात गुंतलेल्या होडी व यांत्रिक होडी आहेत. खाण व्यवसाय ठप्प झाल्याने अनेक युवक या व्यवसायात उतरले आहेत. कुडचडे पोलिस तसेच अन्य अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा व्यवसाय बिनधास्त सुरू आहे. सोशल मिडिया तसेच वर्तमान पत्रात अनेक वेळा यावर आवाज उठविला गेला. परंतु कोणावरही कारवाई  करण्यात आली नाही. सदर या व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या बोटी चार लाख रुपये मोजून भाडेपट्टीवर घेण्यात आलेल्या आहेत. हा व्यवसाय दिवसा ढवळ्या तसेच रात्री-अपरात्री  चालू असतो. कुडचडे पोलिस कोणतीच कारवाई त्यावर करत नाहीत. त्यामुळेच हा व्यवसाय फोफावला असून बेदरकारपणे रेतीचे टेम्पो, ट्रक धावत असतात. आज सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे तसेच बाकी कर्मचारी वर्गाला घेऊन त्यांनी जुवारी नदीपात्रात चाललेल्या कापशे, सावर्डे पंचायतीमागे रेती व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी छापा मारला आणि कारवाई केली. 

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना गावडे म्हणाले, आपल्यापर्यंत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ज्या ठिकाणी धाड टाकली. तेथे काही रेतीवाहू होडी व यांत्रिक होड्या सापडल्यात तर काही जण बोटीसकट पळून गेलेत. रेतीचा साठाही आढळून आला. तो रेतीचा साठा पुन्हा नदी पात्रात टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार ती रेती पुन्हा नदीत टाकण्यात आली. कुडचडे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांना लेखी पत्रव्यवहार तसेच त्यांच्या सोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

संबंधित बातम्या