‘आयआयटी’वरून पेटलेल्या आंदोलनाची धग डिचोलीत

दैनिक गोमन्तक
शनिवार, 9 जानेवारी 2021

पोलिसांनी सुरू केलेल्या अटकसत्राचा निषेध करीत "भारत माता की जय" संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवारी) डिचोलीत धरणे आंदोलन केले.

डिचोली : आयआयटी प्रकल्पावरुन शेळ-मेळावलीत पेटलेल्या आंदोलनाची धग आता डिचोलीपर्यंत पोचली आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या अटकसत्राचा निषेध करीत "भारत माता की जय" संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवारी) डिचोलीत धरणे आंदोलन केले.

आयआयटी विरोधातील आंदोलन मोडून काढण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात येत असून, खोटे गुन्हे नोंद करून पोलिसांनी अटक सत्र सुरू केले आहे. असा आरोप आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी करून, नाहक अटक केलेल्याची त्वरित सुटका करा. त्याचबरोबर अटकसत्र थांबवा. आयआयटी प्रकल्प शेळ-मेळावलीतून  अन्यत्र हलवा. जारी केलेले १४४ कलम त्वरित मागे घ्या, अशी मागणी केली. येथील जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ धरलेल्या या धरणे आंदोलनात भोलानाथ गाड, आत्माराम गावकर, धीरज सावंत, शैलेश फातर्पेकर, नितीन मळगावकर, सुरेश परवार, दत्ताराम हरमलकर, सर्वेश सावंत, पृथ्वी कवठणकर, मेधा मळगावकर, निळकंठ कुंभार, शैलेश जाधव, सचिन परवार आदी मिळून ३० हून अधिक संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या कार्यकर्त्यांनी हातात घोषवाक्य असलेले फलक घेऊन  सरकार विरोधात घोषणा देत शेळ-मेळावलीवासीयांना पाठिंबा जाहीर केला. सुमारे तासभर हे धरणे धरण्यात आले. शेळ-मेळावलीतील जनतेला  आयआयटी प्रकल्प नको असताना सरकारचा त्या ठिकाणीच प्रकल्पाला हट्ट का?  असा प्रश्न आत्माराम गावकर आणि भोलानाथ गाड यांनी उपस्थित करून सरकारच्या जनता विरोधी भूमिकेचा निषेध केला.

आणखी वाचा:

आज ‘विधिकार दिन’..‘भाषक वादा’ची ठिणगी आजही -

संबंधित बातम्या