राजकीय नेत्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने कार्यकर्ते धास्तावले

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

केंद्रीयमंत्री ते आमदार व माजी खासदार अशा बड्या नेत्यांबरोबरच प्राथमिक स्तरावरील नगरसेवक, सरपंच ते पंच अशा राजकीय प्रतिनिधींच्या मागे कोरोनाचे शुक्‍लकाष्ट लागल्यामुळे कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह हे समजणेच मुश्‍कील ठरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

फोंडा: कोरोनाची महामारी गोव्यात आटोक्‍यात येणे महामुश्‍किल ठरत असल्याने सर्वसामान्य लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या फोंडा तालुक्‍यातील राजकीय नेत्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याने या राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. केंद्रीयमंत्री ते आमदार व माजी खासदार अशा बड्या नेत्यांबरोबरच प्राथमिक स्तरावरील नगरसेवक, सरपंच ते पंच अशा राजकीय प्रतिनिधींच्या मागे कोरोनाचे शुक्‍लकाष्ट लागल्यामुळे कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह हे समजणेच मुश्‍कील ठरल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

फोंड्यात सुरवातीला केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री तसेच मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक, त्यांचे पुत्र असलेले नगरसेवक रितेश नाईक तसेच खासदार, आमदारांचे कुटुंबीय आणि आता माजी खासदार तथा राज्य सरकारचे "एनआरआय'' आयुक्त नरेंद्र सावईकरही कोरोना पॉझिटिव्ह ठरल्याने ही चिंता वाढली आहे. 

लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्याकडे सातत्याने संपर्कात असलेले त्यांचे कार्यकर्ते, आपल्या कामासाठी येणारे नागरिक आणि या राजकारण्यांच्या कार्यालयात असलेले कर्मचारी यांनाही कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य ठरले आहे. या राजकारण्यांची कार्यालयेही सध्या बंदच आहेत. एखादा राजकारणी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आपणही पॉझिटिव्ह निघू, या धास्तीनेच काही लोक चाचणी करण्यासाठी इस्पितळात धाव घेत आहेत. कोरोनामुळे राजकीय नेते नागरिकांसाठी उपलब्ध होत नसल्याने काहींची कामे अडून राहिली आहेत. 

दरम्यान, फोंड्यातील राजकीय पुढारी कोरोनाबाधीत होत असल्याने अन्य काही आमदारांनीही स्वतःची चाचणी करवून घेतली आहे. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनीही आपली कोरोना चाचणी करवून घेतली होती, त्यात ते निगेटिव्ह निघाले आहेत. त्यांच्या कार्यालयातही अजून तरी सुरक्षित वातावरण असल्याचे सांगण्यात आले.

फोंड्यात पत्रकार असुरक्षित...!
एखादा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम असो वा राजकीय पुढाऱ्यांच्या पत्रकार परिषदा. पत्रकारांना सगळ्या मंडपाखालून जावेच लागते. राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना व पत्रकार परिषदांना उपस्थित राहून त्यांचे म्हणणे जनतेपर्यंत पोचवणाऱ्या फोंड्यातील पत्रकारांनाही सध्या धोका संभवत आहे. राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदा व कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर हे नेतेच पॉझिटिव्ह असल्याचे समजत असल्याने पत्रकारांच्या कुटुंबियांनीही धास्ती घेतली आहे. सध्या तरी फोंड्यातील पत्रकार सुरक्षित अंतर राखून वावरत असले तरी पत्रकारांच्या सुरक्षेसाठीही सरकारने एखादी प्रभावी योजना आखावी अशी मागणी जोर धरत आहे.

सुदिन ढवळीकर म्हणतात...!
कोरोनामुळे आपण संक्रमित असल्याने खाजगी इस्पितळात दाखल असलो तरी स्वतःच्या खर्चाने हे उपचार घेत असल्याचे मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी जाहीर केले आहे. आपण व आपल्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यानंतर आपण डॉक्‍टर असलेल्या आपल्या भावाच्या सल्ल्यानुसार मणिपाल इस्पितळात दाखल झालो. सरकारी खाटा आधीच कमी असल्याने आम्ही बळकावल्या  तर लोकांना कमी पडू शकतात, म्हणून खाजगी इस्पितळाचा पर्याय स्विकारला. आता आमच्याप्रमाणे इतर राजकीय नेत्यांनीही आपला खर्च आपणच करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या