येत्या निवडणुकीसाठी कामाला लागावे

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

वर्ष २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयश्री मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी केली आहे.

म्हापसा: वर्ष २०२२ मध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयश्री मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी केली आहे.
थिवी मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी कोलवाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे या नात्याने उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

सध्या विरोधक विविध बिनबुडाचे तथा निराधार आरोप करून भाजपाचे नाव नाहक बदनाम करीत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून सर्व कार्यकर्त्यांनी भाजपाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले.

यावेळी बोलताना थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर म्हणाले, भाजपा असा पक्ष आहे, की लोकांपर्यंत कसे जावे, लोकांचे म्हणणे कसे ऐकून घ्यावे हे कार्यकर्त्यांना चांगल्यापैकी ठाऊक आहे. लोकांची गाऱ्हाणी, समस्या ऐकून घेऊन त्यासंदर्भातील विविध प्रश्न सोडवणे हे काम भाजपा कार्यकर्त्यांकडून नेहमीच होत असते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे काम आणखीन व्यापक करून जनेतेशी वेळोवेळी संपर्क ठेवावा, त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हावे, जेणेकरून हा पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, असेही श्री. हळर्णकर यांनी सांगितले.

सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांसमोर जावे, असे आवाहन करून श्री. तानावडे या वेळी म्हणाले, सरकारने राबवलेल्या विविध योजना लोकांपर्यंत तत्परतेने पोहोचवण्याचे कार्यही कार्यकर्त्यानी करणे आवश्यक आहे. जेणेकरून आगामी जिल्हा पंचायत व विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजयश्री मिळू शकेल. भाजपा कोकण रेल्वे आंदोलनात सक्रिय राहिल्यानेच कोकण रेल्वे गोव्यात येऊ शकली, असेही श्री. तानावडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीच्या तयारीविषयी तानावडे यांनी कार्यकर्त्यांना माहिती देऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या