10  मे पर्यंत राज्यात अतिरिक्त निर्बंध लागू : प्रमोद सावंत 

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

माझे सरकार या साथीच्या रोगांमुळे आमच्या गोव्यातील नागरिकांच्या चिंता समजून घेत आहे. यासाठी आम्ही 10 मे 2021 पर्यंत अनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांवर अतिरिक्त निर्बंध लादत आहोत

पणजी : राज्य सरकारने गेल्या महिन्यात 29 एप्रिल पासून 3 मे पर्यंत पाच दिवसांचा लॉकडाऊन लागू  केला होता.  राज्यसरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १० मेपर्यंत गर्दी होणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांवर काही निर्बंध घातले होते , तर  रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यवसायांनाही  50 टक्के क्षमतेने काम करण्याची मुभा देण्यात आली होती. आता 3 मे नंतर लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही अनेक ग्रामपंचयातीनी अद्यापही स्वतःचे लॉकडाऊन लावले आहे.  त्यानंतर आता राज्यसरकारने मंगळवारी गोव्यात पुन्हा एकदा अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.  मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.  (Additional restrictions in the state till May 10: Pramod Sawant) 

गोवा कस्टमच्या इंटेलिजन्स युनिटने पकडले तब्बल 10 लाखांचे सोने

“माझे सरकार या साथीच्या रोगांमुळे आमच्या गोव्यातील नागरिकांच्या चिंता समजून घेत आहे. यासाठी आम्ही 10 मे 2021 पर्यंत अनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांवर अतिरिक्त निर्बंध लादत आहोत. खाद्यपदार्थ घरी पोहचवणारी स्वयंपाकघर वगळता  इतर सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स 10 मे पर्यंत बंद राहतील.' असे ट्विट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.  तसेच, नगरपालिका संस्था आणि पंचायत अंतर्गत बाजारपेठांना सरकारने ठरवून दिलेल्या सामाजिक अंतराच्या नियमांसह  कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करणे अनिवार्य असेल.  मात्र सध्या 'स्वतंत्र लॉकडाउनची आवश्यकता नाही. प्रत्येकाने फक्त सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य आहे.' असेही प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ''इतर सर्व नगरपालिका संस्था आणि पंचायतीना आवश्‍यक सेवा बंद न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बरेच लोक वस्तू विकत घेण्यासाठी बाहेर पडतील त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व आवश्यक सेवा चालू ठेवाव्यात. असेही प्रमोद सावंत यांनी  म्हटले आहे. 

दरम्यान, वाढत्या कोरोनाचा संसर्ग पाहता, विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची  मागणी केली होती. नागरी समाज आणि सैन्य यांचा समावेश असलेल्या कोविड व्यवस्थापनासाठी सरकारने त्वरित एक टास्क फोर्स स्थापन करणे आवश्यक आहे.  तसेच, औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आणि लसींच्या उपलब्धतेबाबत श्वेतपत्रिकेची काढण्यात यावी, अशी मागणी गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली होती. तसेच, अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीखेरीज राज्याच्या सीमा बंद करून नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य करून पर्यटकांच्या प्रवेशास मर्यादित ठेवले पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली होती.  

 

दरम्यान, मंगळवारी गोव्यातील कोविड -19  सक्रिय प्रकरणांची संख्या 26,731 वर पोहचली आहे.  त्यापैकी 2814 नवीन प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात केसांचे सकारात्मकतेचे प्रमाण 42.94 टक्के होते. तर  गेल्या 24 तासात  52 मृत्यूची नोंद झाली आहे. डॉ. शमा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे कोविड-19 सेंटर सुरू करण्याचे आदेश सरकारने मंगळवारी जारी केले. तर चिकलिम आणि कॅनसौलीम याठिकाणी दोन नवी कोविड सेंटर सुरू केले जातील, अशी माहितीही राज्यसरकारकडून मिळाली आहे. 

संबंधित बातम्या