कोविड काळात प्रशासनराज!

कोविड काळात प्रशासनराज!
कोविड काळात प्रशासनराज

पणजी: कोविड महामारीच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती संपूर्ण कारभार गेला असून लोकप्रतिनिधींना कारभारात विश्‍वासात घेण्यात आले नाही, असे निरीक्षण प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. या फाऊंडेशनने देशातील महत्वाच्या शहरांसह गोव्यातही सर्वेक्षण केले होते.

फांऊडेशनने देशभरातील २९ शहरांमध्ये सर्वेक्षण केले असून फक्त तीन शहरांमध्ये लोकप्रतिनिधींचा कोरोनाशी संबंधित कामांमध्ये सहभाग असल्याचे म्हटले आहे.  कोविड टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात आणि मे व जूनमध्ये देशभरात संसर्ग वेगाने वाढत होता; मात्र या बिकट काळातही उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींना वगळून केंद्रिकृत दृष्टिकोन राज्यांनी बाळगला, असे फाऊंडेशनचे अध्यक्ष नीताई मेहता यांनी नमूद केले आहे. देशभरात फक्त कोची, आगरतळा आणि आयझॉल या तीन शहरांमध्येच लोकप्रतिनिधींचा कोरोनाशी संबंधित कामांमध्ये सहभाग असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.

कोरोना संकटात ‘महापालिकांचे महत्त्व आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग’ या विषयावर प्रजा फाऊंडेशनने मुंबईसह आगरतळा, अहमदाबाद, आयझॉल, अमृतसर, भोपाळ, भुवनेश्‍वर, कोईम्बतूर, डेहराडून, दिल्ली, धर्मशाला, गंगटोक, गुरुग्राम, गुवाहाटी, इम्फाळ, इटानगर, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मंगळूर, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलॉंग, उदयपूर, विजयवाडा आणि वारंगळ या देशभरातील २९ शहरांमध्ये हे सर्वेक्षण केले.

सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये विकेंद्रित आणि प्रभावी वितरण नेहमीच महत्त्वपूर्ण असते. विशेषत: कोरोनासारख्या महामारीत घटनेची ७४ वी दुरुस्ती आणि अधिनियम १२  च्या अनुसूचीनुसार राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कामे महापालिकांना सोपवण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात२९ पैकी २० शहरांमध्ये ही कामे अनेक संस्थांकडे सोपवण्यात आली आहेत; तर पाच शहरांमध्येच पालिका ही कामे करत आहेत, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

मुंबईसह सात शहरांमध्येच पालिकेचा सहभाग
देशभरातील २९ शहरांपैकी केवळ आगरतळा, आयझॉल, भुवनेश्‍वर, कोईम्बतूर, कोची, कोलकाता आणि मुंबई या सात शहरांमध्ये पालिकांचा कोरोना उपाययोजनांमध्ये सहभाग आहे. या शहरांत विभाग पातळीवर कामे सुरू आहेत. दिल्ली, अहमदाबाद, धर्मशाला, कोची, मुंबई, इम्फाळ, आयझॉल, भुवनेश्‍वर आणि आगरतळा शहरांत स्थानीय वॉर्ड समितीचा सहभाग आहे. तसेच धर्मशाला, कोची, आयझॉल आणि गंगटोक या शहरांमध्ये प्रभाग समित्या सक्रिय आहेत, असे फांऊडेशनचे मिलिंद म्हस्के यांनी नमूद केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com