अंत्‍यविधीसाठी मृतदेहाची परवड सुरूच

Dainik Gomantak
शुक्रवार, 3 जुलै 2020

राज्यात जेव्हा कोरोना पॉझिटिव्‍ह दोघा व्‍यक्तींचे एकापाठोपाठ मृत्यू झाले होते, तेव्हाही या मृतदेहांच्या अंत्यसंस्काराबाबत अनेकांनी विरोध केला होता. त्यांनतर मडगाव, वास्‍को व नंतर रात्री गुपचूप फोंडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार त्‍या दोन मृतदेहांवर केले होते. त्‍यानंतर कोरोनाबाबत जनजागृती कोविड इस्पितळातील डॉ. मधू घोडकिरेकर आणि इतरांनी केली होती. तरीही आज मृतदेहाची परवड केवळ असहकार्यामुळे झाली.

पणजी  :

ताळगाव येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या व्यक्तीच्या मृतदेहाची परवड ‘१०८’ने मदत न केल्याने झाली. त्‍या व्यक्तीवर पणजीतील - सातिनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते. त्यामुळे सकाळी स्मशानभूमीचे निर्जंतुकीकरणही करण्यात आले. मात्र, ‘१०८’ शववाहिका व्‍यवस्‍थापनाने ऐनवेळी नकार दिल्याने त्‍या व्‍यक्तीवर मडगावात अंत्यसंस्कार करण्‍यात आले. तोपर्यंत मृतदेहाची परवड झाली. दरम्यान, सांतिनेज स्मशानभूमी परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी कोरोनाबाधित मृतदेहावरील अंत्यसंस्काराला विरोध केला. तसेच तेथे अंत्यसंस्कार करण्‍यात येऊ नये, अशा मागणीचे पत्र उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 
राज्यात जेव्हा कोरोना पॉझिटिव्‍ह दोघा व्‍यक्तींचे एकापाठोपाठ मृत्यू झाले होते, तेव्हाही या मृतदेहांच्या अंत्यसंस्काराबाबत अनेकांनी विरोध केला होता. त्यांनतर मडगाव, वास्‍को व नंतर रात्री गुपचूप फोंडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार त्‍या दोन मृतदेहांवर केले होते. त्‍यानंतर कोरोनाबाबत जनजागृती कोविड इस्पितळातील डॉ. मधू घोडकिरेकर आणि इतरांनी केली होती. तरीही आज मृतदेहाची परवड केवळ असहकार्यामुळे झाली. त्‍यामुळे त्‍या कोरोनाबाधित मृत कुटुंबाला त्रासदायक ठरली. तिसऱ्या कोरोनाबाधित मृत महिलेवर अंत्यसंस्कार करताना अनेक लोकांनी सहकार्य करीत अंत्‍यसंस्‍कार केले होते. यावेळी धर्मगुरु व कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड उपस्‍थित होते. दरम्‍यान, ‘१०८’ची कोणती फाईल अडकली, याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. 

लोकांनी अशा संवेदनशील मुद्द्यांच्या बाबतीत सहकार्याची भावना बाळगणे गरजेचे आहे. कारण, कोरोना पॉझिटिव्ह मृत व्यक्तीमुळे प्रसार होत नसल्याची माहिती आम्ही वारंवार देत लोकांची जनजागृती करीत आहोत. ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे. 
-डॉ. मधू घोडकिरेकर, कोविड इस्‍पितळातील तज्‍ज्ञ. 
 

साश्रृ नयनांनी दिला वडिलांना निरोप 
आपल्या वडिलांवर योग्य पद्धतीने ताळगावात विधिवत अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मृत व्यक्तीच्या मुलाची इच्छा होती. त्यांचे वडील इस्पितळात असतानाही त्‍यांना कोरोना झाला म्हणून दूर लोटले नाही. त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी अखेरपर्यंत घेतली. क्वारंटाईन व्‍हावे लागले तरीही चालेल, पण सेवा करणार, असे त्‍यांचे म्‍हणणे होते. तरीही त्यांच्या वडिलांच्या मृतदेहाची अंत्‍यसंस्‍कारासाठी परवड झाली. 

सर्वाधिक ९५ रुग्णांची नोंद 
राज्यात आजवर सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्‍णांची संख्‍या गुरुवारी नोंद झाली. गुरुवारी २४ तासांत एकूण ९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. यामध्ये माशेल, म्हार्दोळ, वाळपई आणि बोरी, शिरोडा येथेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कामराभाट येथील २० घरांचा परिसर सील केला असून लोकांची तपासणी सुरू आहे. तर गुरुवारी ६४ रुग्ण बरे झाले. त्‍यामुळे आता राज्यात एकूण ७४४ रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. कामराभाट येथे २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून यामध्ये एका गोवा वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे. या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी वाढदिवसाची पार्टीही आयोजित केली होती, असेही सांगितले जात आहे. याशिवाय मांगोरहिल परिसरात २४० रुग्ण, मांगोरहिलशी संबंधित २२१, रेल्वे किंवा रस्तामार्गे आलेले ११६ रुग्ण, पर्वरीत ३, मडगावात ९, कुंडईत १, वेर्णा येथे ५, वाळपईत ३, माशेल येथे ३, सांगेत १ रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. 

कोविड इस्पितळात देखरेख समिती 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. यामध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल, आरोग्य खात्यातील माजी संचालक डॉ. संजीव दळवी, डॉ. प्रदीप पडवळ, गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर आणि आरोग्य खात्याचे संचालक डॉ. ‍जोस डिसा यांचा समावेश आहे. 

लोक घेताहेत काळजी 
राज्यात अनेक ठिकाणी रुग्ण सापडत असल्‍याने लोकांनीही बरीच धास्‍ती घेतली आहे. अनेकजण घरातून बाहेर पडताना काळजी घेत आहेत. तसेच घरात आल्‍यानंतर सावधगिरी बाळगत आहेत. वेळोवेळी आपले हात, पाय निर्जंतूक करण्‍याकडे अनेकांचा कल आहे. अनेक सोसायटीमध्ये अनोळखी व्यक्तींना न सोडण्यासाठीच्या सूचना सुरक्षारक्षकांना करण्यात आल्या आहेत, तर अनेक ठिकाणी थर्मल गनद्वारे तपासणी करण्‍यात येत आहे. 
आरोग्‍य खात्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी २९१६ जणांच्‍या चाचण्‍यांसाठी नमुने गोळा केले होते, तर २०४६ जणांचे अहवाल आरोग्‍य खात्‍याच्‍या हाती आले. ३४४ देशी प्रवाशांना आणि १६३ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना क्‍वारंटाईन केले आहे. इस्‍पितळातील आयसोलेशनमध्‍ये आज १० जणांना ठेवण्‍यात आल्‍याची माहिती आरोग्‍य खात्‍याने दिली. यातील १३१७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. विविध हॉटेल तसेच क्वांरटाईन ठिकाणी २२४ जण आहेत. 
 

संबंधित बातम्या