दीपावली सुख समाधान घेऊन येईल : व्यापारी

दीपावली सुख समाधान घेऊन येईल : व्यापारी
After Diwali good days will come to the market

पणजी : दीपावलीच्या निमित्ताने बाजारात सध्या उत्साह आहे. कोविड महामारीच्या कालखंडात सर्व व्यवसाय हिरावला गेला होता. गणेश चतुर्थीवरही कोविडचे सावट होते त्यामुळे जेमतेम उलाढाल बाजारात झाली होती. मात्र दिवाळीत पून्हा पूर्वीचे दिवस व्यापारी अनुभवत आहेत.


दिवाळीनंतर आता बाजाराला चांगले दिवस येतील असे व्यापारी बांधवांना वाटते. यंदा अनेकांनी फेसबुक गट, व्हॉटसॲप गटाच्या माध्यमातून घरगुती साहित्याची वस्तूंची आणि जिन्नसांची विक्री करणे सुरु केले तरी बाजारातील ग्राहकांची पावले वाढली आहेत. दिवाळीनंतरही असेच वातावरण राहील असे व्यापाऱ्यांना वाटते. यंदा चिनी मालावर व्यापारी आणि जनतेने घातलेला बहिष्कार स्पष्टपणे जाणवत आहे. भारतीत उत्पादीत वस्तू आहे की नाही त्यातही गोव्यात तयार झालीय का याची विचारणा करताना ग्राहक दिसत आहेत.


दीपावली हा दिव्यांचा सण, काल रमा एकादशीपासून या उत्सवाला सुरवात झाली. आज वसुबारस होती. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभरात मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने बाजारातील अर्थव्यवस्थेची चाके हलली आहेत. ती सुरु राहिली तर खऱ्या अर्थाने व्यापारी वर्गाच्या जीवनात अर्थ दीपांचा प्रकाश पसरणार आहे.

कोविडमुळे यंदा चतुर्थी काळात बाजारावर बराच परिणाम जाणवला होता. अजूनही कोरोनाचे संकट दूर झालेले नाही. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीवर परिणाम होणार. अशी शंका होती. मात्र चतुर्थीच्या तुलनेत दिवाळी खरेदीला ग्राहकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. चतुर्थीच्या तुलनेत गुरुवारपर्यंत साहित्य खरेदीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 
- विनायक शिरोडकर, घाऊक व्यापारी, सजावट साहित्य (डिचोली)

गेल्या सात आठ महिन्याच्या महामारीतून आता कुठे बाजारात धावपळ दिसून येत आहे. सर्वच चक्र विस्कळीत झाले दोष तरी कुणाला देणार? निदान ही दीपावली आगामी काळात सुख समृद्धी आणि प्रत्येक नागरिकांच्या जीवनात भरभराट घेऊन येवो.
- आशिष करमळकर, तयार वस्तूंचे व्यापारी (सांगे).

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com