कैद्यांच्या उद्रेकाने कारागृह यंत्रणेला जाग

अवित बगळे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

मांसाहारीची मेजवानी, जीवनावश्यक वस्तूंचाही झाला पुरवठा

पणजी

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी काल दिवसभर आहार नाकारून उपोषण केल्याची बातमी गोमन्तकमध्ये प्रसिद्ध झाल्यावर कारागृहाची यंत्रणा खडबडून जागी झाली. आज या कैद्यांना शांत करण्यासाठी मांसाहारी आहार देण्यात आला. कारागृहातील धान्य भांडारातही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. या बातमीची दखल घेत कॉंग्रेस पक्षानेही जीवनावश्यक वस्तू कारागृह प्रशासनाला देण्याचा प्रयत्न केला मात्र कारागृह प्रशासनाने त्यांची मदत नाकारली.
गेल्या काही दिवसांपासून कारागृहातील कैद्यांना खात्याकडून आवश्यक व नियमानुसार द्यावा लागणार आहार दिला जात नव्हता. सकाळचा नाश्ता व जेवण पुरेसा दिला जात नव्हता. या कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर यांच्याकडे अनेकवेळा तक्रारी करून त्यावर काहीच उपयोग होत नव्हता. त्यामुळे कैद्यांमध्ये धगधगणाऱ्या संतापाचा उद्रेक काल झाला अन् तुरुंग व्यवस्थापनाची धावपळ उडाली. कारागृहाचे अधीक्षकांनी धान्य भांडारात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असताना त्याच्या खरेदीसाठी मंजुरी दिली नव्हती. कारागृहातील अधिकाऱ्यांकडून जो मनमानी प्रकार सुरू होता त्यामुळे कैदी अधिकच संतप्त बनले होते. त्यामुळे काल सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कैद्यांनी नाश्ता व जेवण न घेता उपोषण सुरू केले होते व खोल्यामध्ये जाण्यास नकार दिल्याने तेथील वातावरण तंग बनले होते.
कारागृहातील कैद्यांनी काल केलेल्या उपोषणानंतर कारागृहाचे महानिरीक्षक गुरुदास पिळर्णकर यांनी आज सकाळी भेट दिली. त्यांना कारागृहाचा आढावा घेतला व फेरफटकाही मारला. तेथील काही कैद्यांच्या समस्या तसेच अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यांनी घेतलेल्या आढाव्यावेळी तेथील सत्यपरिस्थिती समोर आली. त्यामुळे काही क्षणातच रिते झालेल्या धान्य भांडारमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ट्रकाने करण्यात आला. आज बकरी ईद असल्याने दरवर्षी कैद्यांना चिकनचे जेवण देण्यात येते मात्र त्याऐवजी त्यांना माशांचे जेवण देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार आज जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ट्रकद्वारे करण्यात आला. त्यामध्ये जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू, भाज्यांचा समावेश होता. कारागृहात प्रलंबित असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या बिलाच्या मंजुरीसाठीची फाईल खात्याकडे लवकरच पाठविली जावी असे निर्देश कारागृहातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तुरुंग अधीक्षकाने कारागृहात लागणाऱ्या सामानाची शहानिशा करण्यासाठी बिलांवर सह्या केल्या नव्हत्या. त्याचा फटका कैद्यांना त्यांना आवश्यक व संतुलित आहार मिळण्यास होत होता. या कारागृहात काही कैदी विविध आजाराने पीडित आहेत त्यांना डॉक्टरांनी केलेल्या सूचनेनुसार आहार मिळत नसल्याने उपाशी राहण्याची पाळी येत होती. त्यामध्ये काही वृद्ध कैद्यांचाही समावेश असल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आल्याने व संतुलित आहार मिळाल्याने कैद्यांमध्ये असलेला संताप सध्या तरी मावळला आहे.

काँग्रेसची मदत नाकारली
कॉंग्रेसच्या नेत्यांनी गोमन्तकमधील बातमी वाचून कारागृहातील कैद्यांचे जेवणावाचून हाल होऊ नयेत, यासाठी कोलवाळ कारागृहाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्यासोबत १२५ किलो सोना मसुरी तांदूळ, ४८ लीटर खाण्याचे तेल, २० किलो साखर, ३० किलो गव्हाचे पीठ, १० किलो डाळ, १ गोणी वांगी, १ गोणी कोबी, १ गोणी फ्लावर, मिरची आदी जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला नेला होता. कारागृह प्रशासनाने ही मदत नाकारल्यानंतर त्यातील भाजीपाला बार्देश व मुरगाव तालुक्यातील गरजू लोकांना वाटण्यात आला, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी दिली.
कॉंग्रेसच्या या अभिनव आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, पणजीकर, जनार्दन भंडारी, प्रतिभा बोरकर, दशरथ मांद्रेकर, आश्विन डिसोझा, सतीश चोडणकर, मंगलदास नाईक, आनंद नाईक, शंकर फडते, राजेंद्र कोरगावकर, नारायण रेडकर, भोला घाडी, चंदन मांद्रेकर, उमाकांत कुडणेकर, राजन घाटे, सुभाष केरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या