आगरवाड्यातील मिठागरे धोक्यात

Dainik Gomantak
शुक्रवार, 29 मे 2020

आगरवाडातील भात शेतीही नामशेष होण्याच्या मार्गावर : दुरुस्तीची मागणी

मोरजी

आगरवाडा- चोपडे पंचायत क्षेत्रातील शापोरा नदीतीरावरील ‘आगरपोय’ बंधाऱ्याच्या मानशीच्या अर्धवट स्थितीतील बांधकामामुळे आगरवाडातील पारंपारिक मिठागरे आणि भातशेती धोक्यात आली आहे. जलसिंचन खात्याने या बंधाऱ्यावरील मानशीचे काम पूर्ण करावे, तसेच मानशीसमोर साचलेला गाळ आणि माती उपसून पाण्याला वाट करून घ्यावी, जेणेकरून आम्हाला मिठागरे आणि भातशेती करता येईल असे इथल्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना आगरवाडा येथील युवा शेतकरी भगवान परब यांनी सांगितले की, शारीरिक शिक्षणात पदवी संपादन केलेल्या माझ्यासारख्या युवकाला नोकरी न मिळू शकल्याने आम्ही आमच्या पारंपरिक शेती आणि मीठ उत्पादनाच्या व्यवसायात लक्ष घातले. गेली अनेक वर्षे आपण या व्यवसायात आहे. या व्यवसायात खूप मेहनत करावी लागते, तरीसुद्धा माझ्या बरोबर अनेकांनी या व्यवसायात लक्ष घालून हा व्यवसाय सांभाळला आहे. मात्र, पारंपरिक व्यवसाय सांभाळा, असे सांगणाऱ्या सरकारनेच आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. आमदार- मंत्री आपल्या भाषणात आजच्या युवकांना शेती व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन करतात. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांची पार दुर्दशा झालेली आहे. सुमारे १०-१५ वर्षे आधी बांधलेला इथला शापोरा नदीतीरावरील बंधारा आजही अर्धवट स्थितीत आहे. बंधाऱ्यावरील मानशीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे याचा थेट परिणाम मिठागरे आणि भात शेतीवर झाला आहे.

मिठागरांचे अस्तित्व धोक्यात
मिठागरामुळे ‘आगरवाडा’ नाव पडलेल्या या गावातील लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन म्हणजे शेती आणि मिठागरे याला जोड म्हणून गुरे पाळणे भाजीपाला, आंबे काजू आदी लागवड केली जाते. पावसाळ्यात शेती करणारे हे लोक उन्हाळ्यात मिठाचा पारंपरिक व्यवसाय करतात त्यामुळे शेतीला पूरक असलेला हा व्यवसाय इथल्या लोकांनी अनेक वर्षे जपला आहे. गोव्यात इतर ठिकाणी असणारी मिठागरे वसवण्यासाठी कर्नाटकातून कामगार आणले जातात. मात्र, आगरवाडा हा असा गाव आहे की, ज्या ठिकाणी स्थानिकच मिठाचा व्यवसाय कैक वर्षापासून करीत आले आहेत. मात्र, अलीकडच्या काळात गावातील युवक शिकायला लागल्याने नोकरी करू लागले असले तरी याचे प्रमाण खूपच कमी आहे, त्यामुळे काही सुशिक्षित युवकही या व्यवसायात आहेत. मात्र, एकूण आठ मिठागरांपैकी गेल्यावर्षी पर्यंत ५ मिठागरे सुस्थितीत होती. यावर्षी फक्त ३ नच मिठागरात मिठाचे उत्पन्न होऊ शकले

आगरपोय बंधारा आणि मानस निकृष्ट
शापोरा नदीच्या खाऱ्या पाण्यावर नैसर्गिकरित्या मीठ तयार होत असते त्या शापोरा नदी तीरावरील ‘आगरपोय’ बंधाऱ्याची संरक्षक भिंत जलसिंचन खात्यातर्फे उभारण्यात आली होती. चोपडे जुन्या फेरीधक्यापासून बेथखोल-आगरवाडापर्यंत सुमारे तीन किमी लांबीचा हा बंधारा सिमेंट काँक्रिटने पक्का तयार करण्यात आला. खरा परंतु १०-१२ वर्षापूर्वी बांधलेल्या या बंधाऱ्यादरम्यान दोन ठिकाणी ‘मानस’ची सोय करण्यात आली होती. त्याला दरवाजे लावून शापोरा नदीचे पाणी आतबाहेर जातयेत होते परंतु अलीकडे या निकृष्ट मानसीचे दरवाजे उघडे राहत असल्याने मिठागरातील पाण्याचा योग्य निचरा होत नाही त्यामुळे सुस्थितीत असलेली मिठागरे पाण्याखाली आली आहेत.

निकृष्ठ बंधाऱ्यामुळे भातशेती धोक्यात
आगरपोय बंधाऱ्याची पडझड झाल्याने शापोरा नदीचे खारे पाणी येथील भात शेतीत मोठ्या प्रमाणात घुसत असल्याने भात शेती उत्पादनास योग्य राहिलेली नाही. गेल्या दोन चार वर्षापासून ही भात शेती पावसाळ्यात पाण्याखाली येत असल्याने शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिली आहे. पावसाळ्यात या शेतीला पूर्णपणे तलावाचे स्वरूप प्राप्त होते. बंधाऱ्यावरील मानशीतून मोठ्या प्रमाणात भातशेतीत खाऱ्या पाण्याचा शिरकाव होतो. ठिकठिकाणी बंधाऱ्याला भगदाडे पडल्याने शेतात शापोरा नदीचे पाणी घुसते, त्यामुळे साचून राहिलेल्या पाण्यात शेती करणे शक्य होत नाही, त्यामुळे सरकारने यासर्व बाजूंचा विचार करून आगरपोय बंधारा व त्यावरील मानस तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या