शेवटी काम बंद केल्यावरच ग्रामस्थ परतले घरी

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करून काम बंद करण्यास धवर्ली मडगाव  येथील ग्रामस्थ, सरपंच व आमदार लूईजीन फालेरो यांनी चर्चा केली. शेवटी काम बंद केल्यावरच ग्रामस्थ  घरी परतले.

सासष्टी: रेलमार्ग दुपदरीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा धसका सरकारात असलेल्या सासष्टीतील आमदार - मंत्र्यांनी घेतला असून जलसंपदामंत्री व वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी आंदोलकांच्या मागण्यांशी सहमती दर्शवण्याबरोबरच आंदोलन शांततापूर्ण मार्गाने केल्या आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासनही दिले आहे.  

केंद्रीय मंत्री गोव्यात येऊन निर्णय घेईपर्यंत रेलमार्ग दुपदरीकरणासंबंधी होणारे सर्वेक्षण, सीमांकन तसेच बांधकाम गोवा सरकारने बंद करावे, अशी मागणी रॉड्रिग्ज यांनी केली. जोपर्यंत केंद्रीय मंत्री गोव्यात दाखल होऊन योग्य निर्णय घेत नाही, तोपर्यंत सासष्टी तालुक्यात रेल्वे दुपदरीकरणाचे काम सुरू होण्यास देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

सांजुझे आरियल पंचायतीकडून रेलमार्ग दुपदरीकरणासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता काम सुरू केल्याच्या विरोधात, तसेच रेलमार्ग दुपदरीकरण विरोधात आवाज उठविणाऱ्या आंदोलकर्त्यांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी आज नेसाय- सांजुझे आरियल रेल्वे क्रॉसिंगजवळ मोठ्या संख्येने नागरिकांनी जमून आंदोलन पुकारले. या परिसरात  तणाव निर्माण होऊ नये, यासाठी मंत्री रॉड्रिग्ज यांनी या ठिकाणी धाव घेऊन आंदोलकांना सामोरे गेले. 

रेलमार्ग दुपदरीकरणाच्या विरोधात मोठ्या संख्येने गोमंतकीय रस्त्यावर उतरून यास विरोध करीत असून हे आंदोलन संपूर्ण गोव्यात पसरत चालले आहे. या आंदोलनामुळे सरकारवर ताण येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतयांना कळविण्यात आले आहे. या प्रकल्पाचा परिणाम  सरकारला माहीत आहे. परंतु, हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने मुख्यमंत्र्यांनी   केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून यावर योग्य निर्णय घेण्यासाठी केंद्रीय मंत्री गोव्यात येणार आहे, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. 

सध्या गोव्यात दुपदरीकरण करण्यासाठी सर्वेक्षण, सीमांकन आणि बांधकाम करण्यात येत असून जोपर्यत केंद्रीय मंत्री गोव्यात येऊन योग्य निर्णय घेत नाही, तोपर्यत सर्व काम सरकारने बंद ठेवणे आवश्यक आहे. या दुपदरीकरणा विरोधात आवाज उठविणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गोमंतकीयाद्वारे करण्यात येणारे हे आंदोलन शांततापूर्ण असल्याने आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांचा आवाज पोलिसानी दाबण्याचा प्रयत्न करू नये, हे पोलिसांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे, असे रॉड्रिग्ज यांनी स्पष्ट केले. सासष्टी तालुक्यात रेलमार्ग दुपदरीकरणासंबंधी कुठल्याही प्रकारचे काम हाती घेण्यात येणार नाही याची दखल घेण्यात येणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

रेलमार्ग  विरोधात आवाज उठविणाऱ्या आंदोलकांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे दुपदरीकरणा विरोधात सरकारला निवेदन सादर करावे, दुपदरीकरणासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया बंद करावी,  आंदोलांकर्त्यांविरोधात पोलीस महासंचालकांनी केलेले वक्तव्य तथ्यहीन असल्यामुळे पोलीस महासंचालकाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी रॉड्रिग्ज यांच्याकडे यावेळी केली. 

रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करून काम बंद करण्यास धवर्ली मडगाव  येथील ग्रामस्थ, सरपंच व आमदार लूईजीन फालेरो यांनी चर्चा केली. त्यावेळी रेल्वेअधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि स्थानिक  अधिकारी तिथे उपस्थित होते.

तर आंदोलनातही सहभाग
रेलमार्ग दुपदरीकरणा विरोधात गोमंतकीयांनी सुरू केलेले आंदोलन शांततापूर्वक केल्यास आम्हीही यात सहभागी होणार असून  नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनाला निश्चितच यश मिळणार, असे फिलिप नेरी यांनी सांगितले.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या