कृषी खाते आत्मनिर्भरतेकडे

Dainik Gomantak
रविवार, 17 मे 2020

सेंद्रिय कृषी पद्धत जगभर सध्या प्रचलित असून, कुठलीच रसायने यात वापरली जात नाहीत. 

पणजी

उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत कृषीखात्याच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रामुख्याने परंपरागत कृषी विकास योजनेचा आढावा घेण्यात आला. 
हा आढावा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आला. परंपरागत कृषी विकास योजने अंतर्गत ५०० सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट करणे व त्यांना सेंद्रिय कृषी पद्धतीत प्रशिक्षण देणे असा उपक्रम आहे. लागवडी नंतर या सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाचे विपणन व विक्री प्रक्रिया सुद्धा ह्याच योजनेचा भाग आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला इतर मालापेक्षा जास्त मोबदला मिळतो व ग्राहकाला या आरोग्याला पोषक भाजीपाल्याचा फायदा होतो. सेंद्रिय कृषी पद्धत जगभर सध्या प्रचलित असून, कुठलीच रसायने यात वापरली जात नाहीत. 
सरकारी योजनेंतर्गत काही कंत्राटदार नेमले असून, सध्या टाळेबंदीमुळे हे कंत्राटदार आपापल्या राज्यात अडकून बसले होते. ह्या आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये सामील होण्यासाठी हे कंत्राटदार आपापल्या राज्यातून सामील झाले होते. ५०० गट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील प्रक्रियेसाठी ह्या कंत्राटदारांनी गोव्यात येणे गरजेचे आहे. 
कोव्हीड १९ च्या टाळेबंदीमुळे गोव्यात शेती विषयाला प्राधान्य मिळाले असून, गोव्याबाहेरून आणाव्या लागणाऱ्या भाजीपाल्याचा विषय चर्चेचा ठरला आहे. "गोव्यात दर दिवशी ४०० टन भाजीपाल्याची आवक होत असते. त्यातली फक्त १० टन भाजी ही गोव्यात पिकते. गोव्याबाहेरून येणाऱ्या या भाजीपाल्याची गुणवत्ता आणि प्रमाण आपल्या हातात नसते. त्यामुळे अशी भाजी आपल्याला खावी लागते. हि गोष्ट प्रत्येक गोवेकराला लक्षात आल्यामुळे, आज प्रत्येक जण भाजीपाला पिकविण्यासाठी पुढे सरसावला आहे. हीच गोष्ट मी अगदी सुरवातीपासून सांगत आलो आहे की, शेतीला व्यवसाय या दृष्टिकोनाने बघितले पाहिजे. आज अनेक शिक्षित तरुण शेती करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. अशा तरुण पिढीला आम्ही शक्यतो सर्व मदत देणार आहोत. यासाठी येत्या काही दिवसात विशेष उपाय योजना समोर आणू", असे कवळेकर यावेळी म्हणाले.+

संबंधित बातम्या