कृषिमंत्री बाबू कवळेकर ऐकली डिचोलीतील शेतकऱ्यांची गाऱ्हाणी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

सभापती पाटणेकर यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी डिचोलीत येवून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतल्याबद्‌दल समाधान व्यक्‍त केले. शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार निश्‍चितच उपाययोजना करणार. असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त केला.

डिचोली: शेतकऱ्यांबाबतीत सरकार संवेदनशील आहे. शेतकऱ्यांना आधार आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणाऱ्या सुलभ योजना अंमलात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. तांत्रिक अडचणीवर मात करून पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित आर्थिक मदत कशी देता येईल. यासाठीही कृषी खात्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती कृषिखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगून, मागीलवर्षी आणि अलीकडेच पूराचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ''सुवर्णमध्य'' काढण्यात येईल. अशी ग्वाही दिली.

 

डिचोली येथे शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर बोलत होते. ‘कोविड’ महामारीच्या काळातसुद्धा कृषी आधार निधींतर्गत ५.५ कोटींची आर्थिक मदत मंजूर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर यांनी सांगून, कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषी व्यवसायात पुढे यावे, असे आवाहन केले.

 

यावेळी डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर, कृषी खात्याचे संचालक नेव्हील आफोन्सो आणि डिचोलीच्या विभागीय कृषी अधिकारी संपत्ती धारगळकर उपस्थित होते. डिचोली येथे सभापती पाटणेकर यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस पुराचा तडाखा बसलेल्या साळ गावातील बाबी राऊत, गुरुदास देसाई, श्री. परब यांच्यासह अन्य भागातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईविषयी तसेच रानटी श्वापदांचा उपद्रव, फेन्सिग योजना आदी अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या.

 

सभापती पाटणेकर यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी डिचोलीत येवून शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतल्याबद्‌दल समाधान व्यक्‍त केले. शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार निश्‍चितच उपाययोजना करणार. असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त केला.

 

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर, सभापती पाटणेकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना कवाथे वितरीत करण्यात आले. यावेळी कृषी खात्याचे अन्य अधिकारी तसेच मुळगावचे सरपंच प्रकाश आरोंदेकर आणि अन्य उपस्थित होते.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या