कृषिमंत्र्यांनी साजरा केला अनोखा दसरा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर हे धनगर समाजातील आहेत. बेतूल येथे राहत्या घरी त्यांनी पारंपरिक पद्धतीने तीन दिवसीय दसरा सण साजरा केला.

पणजी : सीमोल्लंघनानंतर प्राण्याचा बळी देणे, असा रिवाज दसरा या सणादिवशी सर्वत्र आहे. प्राणी बळी देण्याच्या या संस्कृतीला बगल देणारा एकमेव दसरा राज्यात साजरा केला जातो ज्याला धनगरी दसरा असे संबोधले जाते. हा दसरा शाकाहारी पद्धतीने साजरा केला जातो, यावेळी कोणताही रक्तपात केला जात नसल्याने खऱ्या अर्थाने हा दसरा प्राणी वाचविण्याचा संदेश देणारा दसरा असल्याची माहिती कृषीमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी त्यांच्या घरच्या दसऱ्यादिनी दिली. 

गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर हे धनगर समाजातील आहेत. बेतूल येथे राहत्या घरी त्यांनी पारंपरिक पद्धतीने तीन दिवसीय दसरा सण साजरा केला. नवरात्रोत्सवाच्या आठव्या माळेवर तोरण बांधून ह्या दसऱ्याची सुरवात होते. पहिल्या दिवशी नारळाचे तोरण उभारून कुलदेव श्री विठो देवबाला घरात स्थापन केले जाते. त्या रात्री जागर आणि नंतर गाऱ्हाणे व महाप्रसाद असतो. दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरात्रोत्सवाच्या नवव्या माळेवर कुलदेवाला विशेष स्नान, नवीन वस्र परीधान करून ''दुडगो'' ठेवला जातो व त्याची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी म्हणजे नवरात्रोत्सवाच्या दहाव्या माळेवर हत्यारांचे पूजन होते. दुपारी कुलदेवाचे सीमोल्लंघन केले जाते. मांडावर जाऊन गाऱ्हाणे घातले जाते जिथे काहींच्या अंगात भार येतो. मांडावरचा कार्यक्रम झाल्यानंतर नारळाचे तोरण उतरविण्याचा कार्यक्रम होतो आणि दसरा उत्सवाची सांगता होते अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी यावेळी दिली. 

संपूर्ण तीन दिवसांच्या या कार्यक्रमात कुठेच जनावरांचे रक्त सांडले जात नाही उलट त्यांची चांगली निगा राखली जाते. तसेच राना वनात मिळणाऱ्या कंद मुळांची भाजी व इतर पदार्थ बनवून प्रसाद म्हणून सेवन केले जाते असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी यावेळी सांगितले. आत्ता पर्यंत दरवर्षी दसऱ्याचे सर्व सोपस्कार वडील (कै.) राघू कवळेकर करायचे. यंदा ते हयात नसल्यामुळे मी हे सोपस्कार पारंपरिक पद्धतीने पूर्ण केले, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या