बेकायदेशीर बांधकाम बंद करण्याची मागणी: अक्षय पोतेकर

वार्ताहर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

कुचेली कोमुनिदादने बेकायदेशीररित्या कुचेली मैदानाचे रुपांतर भूखंड तयार करून विक्रीसाठी बांधकाम चालू केले आहे.

म्हापसा:  कुचेली कोमुनिदादने बेकायदेशीररित्या कुचेली मैदानाचे रुपांतर भूखंड तयार करून विक्रीसाठी बांधकाम चालू केले आहे. या प्रकाराच्या विक्रीसाठी बांधकाम चालू केले आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ  आज कुचेली मैदान बचाव समितीने बार्देशचे उपजिल्हाधिकारी अक्षय पोतेकर यांची भेट घेऊन कुचेली मैदान खेळाडूंसाठी सुरक्षित ठेवण्याचा आग्रह धरला, तसेच बेकायदेशीररित्या चाललेले बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी या शिष्टमंडळांनी केली तसे न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. 

कुचेली मैदान बचाव व शिष्टमंडळात उत्तर गोवा कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय भिके, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे, शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, नगरसेवक चंद्रशेखर बेनकर, पीपल्स युनियनचे नेते सुदेश तिवरेकर, सुनिल नार्वेकर, नरेश विर्नोडकर, विजय घाणेकर, रविचंद्र कोरगांवकर, भोलानाथ घाडी, लक्ष्मण देसाई, प्रवीण आसोलकर, सुशांत परब, दशरथ मांद्रेकर, आदी नागरिकांचा समावेश होता. 

उपजिल्हाधिकारी अक्षय पोतकर यांनी शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले आपण येत्या तीन दिवसात या कुचेली मैदानासंदर्भात मामलेदाराकडून चौकशी करून घेतो. भू-महसूल कायद्याच्या ३५ कलमाखाली बेकायदेशीर बांधकाम केले असेल तर या नियोजित प्रकल्पाखाली स्थगिती देण्यात येईल. खेळाडूवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे सांगितले.

संबंधित बातम्या