आलेक्स रेजिनाल्ड यांनी जनतेची दिशाभूल करू नये

Uttam Gaonkar
सोमवार, 13 जुलै 2020

बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव भाजप पक्षात सामील झाल्याचा दावा करून कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे बाणावली तसेच गोव्याच्या लोकांची दिशाभूल करीत असून आपण गोव्यातील भाजप सरकारला केवळ मुद्दावरून पाठिंबा दिलेला आहे, थेट पाठिंबा कधीच दिलेला नाही अशी माहिती आमदार चर्चिल आलेमाव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच आलेक्स रेजिनाल्ड यांनी आपल्याविरुद्ध तथ्यहीन आरोप करून गोमंतकीयांची दिशाभूल करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सासष्टी
तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सरकार असताना आपल्याला मंत्रिपद देऊन भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रस्ताव दिला होता, पण आपण तो प्रस्ताव नाकारला होता. भाजपने रेजिनाल्ड यांना नगरनियोजन मंत्रिपद दिले नाही म्हणून रेजिनाल्ड भाजपमध्ये गेले नाहीत, अशी टीका आमदार चर्चिल आलेमाव यांनी केली.
कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड बाणावलीत येऊन आपल्यावर तथ्यहीन आरोप करून लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र, बाणावलीतील लोक आपल्याला पूर्णपणे जाणून आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे चर्चिल आलेमाव यांनी सांगितले. आपल्यावर भाजपमध्ये सामील झाल्याचा आरोप करणाऱ्या रेजिनाल्ड यांच्या वाढदिवसालाच मुख्यमंत्री प्रमुख अतिथी म्हणून का उपस्थित होते, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्यात कोरोनाचा हाहाकार असताना कुणीही राजकारण करणे बरोबर नाही. राजकारण करण्यासाठी कोरोनाची स्थिती नियंत्रणात येण्याची वाट पाहावी. नंतर राजकारण करावे, असेही ते म्हणाले. काँग्रेसमधून भाजप पक्षात प्रवेश केलेल्या आमदारांना पुढे भाजप तसेच काँग्रेसची उमेदवारी मिळत नसल्यास भविष्यात त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याविषयी विचारले असता ते म्हणाले, की जो आमदार लोकांसाठी काम करण्यास तयार आहे त्या आमदाराला निश्चितच पक्षात घेण्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या