राज्यातील भाजपविरोधी पक्षांनी बिहार निवडणूक निकालातून बोध घेण्याची गरज

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.

पणजी : हल्लीच झालेल्या बिहारमधील निवडणुकांत विरोधी पक्षानी एकत्र येऊनही जागा वाटपावर समझोता न केल्याने भाजपने डाव साधून बाजी मारली. हा निकाल गोव्यातील विरोधी पक्षांना धडा शिकवणारा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.

बिहारमधील निवडणुकीवर देशातील अनेक राज्यांचे लक्ष होते. राष्ट्रीय जनता दल हा सर्व समाजांना जवळ करणारा पक्ष होता मात्र काँग्रेसने तिकिट वाटपात अधिक जागा आपल्याकडे ठेवल्याने भाजप आघाडीला त्याचा फायदा झाला. त्यामुळेच भाजपला पराभूत करायचे असल्यास सर्व प्रादेशिक पक्षांनी एकजुटीने एकत्र येऊन निवडणूक लढवायला हवी व त्यासाठी काँग्रेसची गरज आहे. सध्या गोवा फॉरवर्डने २५ मतदारसंघात उमेदवार शोधलेले आहे मात्र काहीजणांचीच नावे घोषित केली आहे. निवडणुकीला १४ महिने बाकी असतानाच उमेदवारांची नावे घोषित करण्यास सुरवात करणारा गोवा फॉरवर्ड हा एकमेव पक्ष आहे. राष्ट्रीय पक्ष उमेदवारीची आमिषे दाखवून फक्त झुलवत ठेवतात. पक्षाने दिलेली उमेदवारी आगामी निवडणुकीवेळी बदलणार नाही असे विजय सरदेसाई यांनी ठामपणे सांगितले. 

निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार घोषित करून लोकांना संभ्रमात टाकण्यापेक्षा त्यांना पर्याय मिळावा म्हणून गोवा फॉरवर्डने मुहूर्त न पाहता उमेदवार शोधमोहीम सुरू केली आहे. भाजप विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र यावे व त्यांनीही आगाऊ उमेदवारांची नावे जाहीर करावीत. शेवटच्या क्षणापर्यंत राहू नये, असे माझे मत आहे, असे सरदेसाई म्हणाले.

म्हादईप्रश्नी गोवा सरकारला गांभीर्य नाहीच
दोन दिवसांच्या दिल्ली भेटीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्यात परतले. त्यांनी केंद्रातील अनेक मंत्र्यांशी चर्चा केली मात्र त्यांनी म्हादई प्रश्‍न अजूनही सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस का येत नाही याची चौकशी का केली नाही. बिगर गोमंतकिय वकिलांची ‘फौज’ या म्हादईसाठी नेमण्यात आली त्यांच्याकडे का बोलणी केली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये का संपर्क केला नाही, असा सवाल आमदार सरदेसाई यांनी केला. गोव्याचा एका वर्षाचा अर्थसंकल्प आहे तेवढीच सुमारे १६ हजार कोटींची रक्कम कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी तरतूद केली आहे. यावरून म्हादईप्रश्‍नी गोवा सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका आमदार सरदेसाई यांनी केली.

संबंधित बातम्या