भाजपच्या कारकीर्दीत राज्याचा चौफेर विकास

प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

सुभाष शिरोडकर ः कलमामळ येथील गणपती विसर्जनस्थळाचे उदघाटन

बोरीत जिल्हापंचायती मार्फंत अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवले आहेत. त्याचा पुरेपूर फायदा नागरिकांनी करून घ्यावा. भाजप सरकारच्या कारकीर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याचा चौफेर असा विकास केलेला आहे. सध्या कोविड महामारीच्या संक्रमणामुळे विकास कामाना खीळ बसलेली आहे. 

 मंजूर करून आणलेली करोडो रू.ची विकास कामे येत्या काळात होणार आहे असे प्रतिपादन शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी केले. बोरी जिल्हा पंचायतीतर्फे कलमामळ येथील नाल्याशेजारी सुमारे साडेचार लाख रू.  खर्चून बांधलेल्या आणि सौंदर्यीकरण केलेल्या गणपती विसर्जन स्थळाचा उद् घाटन समारंभाप्रसंगी आमदार शिरोडकर बोलत होते.

मंगळवार १५ रोजी झालेल्या या समारंभाप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, सरपंच भावना नाईक, उपसरपंच सुनील सावकर, पंचायत सदस्य कमलाकांत गावडे, दीपिका नाईक, फिलोमिना वाझ आदी मान्यवर उपस्थित होते. 

शिरोडकर म्हणाले की, शिरोडा मतदारसंघातील चारही गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि येथील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा नागरिकांनी करून घ्यावा. कलमामळ कुडयाळ भागातील लोकांची गणपती विसर्जनाची चांगली सोय व्हावी म्हणून दीपक नाईक बोरकर यांनी चांगली योजना आखून ती चालीस लावल्याबद्दल शिरोडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर म्हणाले की, माझ्या जिल्हापंचायत सदस्यपदाच्या कारकीर्दीत उपलब्ध झालेला निधी सार्वजनिक ठिकाणी वापरून लोकांच्या गरजा पूर्ण करून देण्यास मी यशस्वी झालो आहे. यापुढेही मतदारसंघातील लोकांच्या अधिकाधिक उपयोगी पडण्यासाठी मी झटणार आहे असे ते म्हणाले. 

उपसरपंच सुनील सावकर यांनी जिल्हापंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर यांचे कौतुक करून कलमामळ कुडयाळ भागातील नागरिकांची गणपती विसर्जनासाठी होणारी गैरसोय दूर केल्याबद्दल अभिनंदन करून नाईक बोरकर यांनी सार्वजनिक ठिकाणी अशाच प्रकारचे विविध प्रकल्प राबवावे असे सांगितले. आमदार सुभाष शिरोडकर, दीपक नाईक बोरकर, सरपंच भावना नाईक उपसरपंच सुनील सावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच नामफलकाचे अनावरण करून सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. दीपक नाईक बोरकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर पंचसदस्य कमलाकांत गावडे यानी आभार मानले. यावेळी बरेच ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या