मुख्यमंत्र्यांकडून फक्त सामान्यजनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम: अमरनाथ पणजीकरांची टीका

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

अमरनाथ पणजीकर म्हणाले, केवळ आपली जाहिरातबाजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी संकटात असलेल्या जनतेला कोरोनावर मात करण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन केले होते.

पणजी: केवळ घोषणाबाजी करण्यात पटाईत असलेल्या भाजप सरकारने वीज बिलांतील निश्चित शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करुन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर पत्रकार परिषदेत केली. सुट-बुट वाल्यांचे सरकार घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

 

त्यांच्या सोबत माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, डिचोली गट अध्यक्ष मेघश्याम राऊत व समाज माध्यम प्रमुख प्रतिभा बोरकर होत्या. पणजीकर म्हणाले, केवळ आपली जाहिरातबाजी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी संकटात असलेल्या जनतेला कोरोनावर मात करण्यासाठी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यानी श्रीराम मंदिराच्या भूमि पुजन दिनी मोदींचे बॅनर लाऊन घरांवर रोषणाई करण्यास लोकांना सांगितले होते. त्यामुळे सरकारला आता लोकांनी विजेचा वापर जास्त केला म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही.

 

सरकारने निश्चित शुल्कात दिलेली ५० टक्के सवलत म्हणजे एकूण बिलाच्या रकमेतील २ टक्के सुद्धा होत नाही, असेही पणजीकर म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या