महाराष्ट्राच्या हद्दीतून गोव्यात माघारी धाडली रुग्णवाहिका; कोरोना रुग्णांसह गायब

महाराष्ट्राच्या हद्दीतून गोव्यात माघारी धाडली रुग्णवाहिका; कोरोना रुग्णांसह गायब
Ambulance sent back from Maharashtra disappears in Goa

पेडणे: गोव्‍यातून अहमदनगर (महाराष्‍ट्र) येथे जाण्‍यासाठी निघालेले रुग्‍णवाहिकेतून चारजण पत्रादेवी सीमा ओलांडून गेले. मात्र, ती रुग्‍णवाहिका बांदा-सटमटवाडी (महाराष्‍ट्र हद्द) येथील सीमा तपासणी नाक्यावर सिंधुदुर्ग पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवली. रुग्णवाहिकेतील चारहीजणांची थर्मल गनने तपासणी केली असता त्यांचे तापमान जास्त असल्याचे जाणवले. तसेच त्‍यांची ऑक्सिजनची पातळीही कमी असल्याचे निदर्शनास आले. या लक्षणांवरून त्यांची चौकशी केली व तपासणी केली असता ते चौघेही कोरोना रुग्ण असल्याचे उघड झाले. त्‍यामुळे त्‍यांना महाराष्‍ट्र हद्दीत प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, या घटनेमुळे तेथील कर्मचारी आणि पोलिसांची तारांबळ उडाली. ही घटना काल रविवारी सायंकाळी घडली.

रुग्‍णवाहिकेतील चारहीजण कोरोनाबाधित असल्‍याचे उघड झाल्‍यावर तपासणी नाक्‍यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. तेथील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून दिली. तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी तात्काळ बांदा तपासणी नाक्यावर आले व ‘त्या’ रुग्णवाहिकेतील व्यक्तींची समजूत काढत गोव्यातच त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा सल्ला दिला.

अखेर ही रुग्णवाहिका पुन्हा गोव्यात गेल्याने तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने संजू विर्नोडकर व पथकाने तपासणी नाक्याची जंतुनाशकाद्वारे फवारणी करत नाक्याचा परिसर निर्जंतुक केला. बांदा तपासणी नाक्यावर कोरोनाची लागण झालेल्या चार रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका गोव्यात उपचारासाठी ह्या रुग्णांना घेऊन कुठे गेली, हे स्पष्ट झाले नाही. हे चारही रुग्ण म्हणजे गोव्यात आलेले पर्यटक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com