संजीवनी’ कारखान्याच्या ऊस वाहतूकदारांची रक्कम थकली

Monodaya fadte
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

गोव्यातील ऊस कर्नाटकातील लैला कारखान्याला पुरवठा करण्यासाठी राज्यातील वीस बाविस ट्रक कार्यरत होते. त्यात बारा ट्रक सांगे भागातील आहेत. इतर ट्रक कर्नाटकातील आहे. अद्याप गोवाभरातील वाहतूक केलेल्यांची एकूण रक्कम वीस लाखपेक्षा अधिक आहे.

सांगे,  संजीवनी सहकारी साखर कारखान्याने नियुक्त केलेल्या ऊस वाहतूक कंत्राटदाराने वाहतूक केलेल्या शिल्लक बिलाची रक्कम अद्याप दिली नसल्याने वाहतूक केलेल्यांनी चिंता व्यक्त केली असून चतुर्थी सण जवळ आल्याने थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गोव्यातील ऊस कर्नाटकातील लैला कारखान्याला पुरवठा करण्यासाठी राज्यातील वीस बाविस ट्रक कार्यरत होते. त्यात बारा ट्रक सांगे भागातील आहेत. इतर ट्रक कर्नाटकातील आहे. अद्याप गोवाभरातील वाहतूक केलेल्यांची एकूण रक्कम वीस लाखपेक्षा अधिक आहे. यात सांगेतील नऊ लाख रुपये वाहतूकदारांना येणे आहे. यापूर्वी दोन वेळा रक्कम देण्यात आली आहे. शेवटचा हप्ता अद्याप देण्यात आलेला नसून कधी देणार तेही सांगण्यात आलेले नाही.
गोवा सरकारने ऊस तोड करण्यासाठी प्रति मेट्रिक टन १ हजार रु., तर ऊस वाहतुकीसाठी प्रति मेट्रिक टन १५०० रु. देण्यात आले. यंदा पुरविण्यात आलेल्या एकूण ऊसाचा खर्च पाहता तो प्रति टन ९ हजार रु. आला असा अंदाज आहे. एकूण लैला कारखान्याला पुरविलेल्या ऊसाची रक्कम एकत्र केल्यास पस्तीस कोटी रुपये होतात. हीच रक्कम शेतकरी मागणी करीत असलेल्या नुकसान भरपाई म्हणून दिल्यास ती किमान पाच सहा वर्षांसाठी पुरेल इतकी होऊ शकते.
मात्र, गोव्यातील ऊस लैला कारखान्याला फुकट पुरवून संजीवनीने काय साध्य केले ते कळण्यास मार्ग नाही. उभ्या ऊसाची किंमत दिल्यास तोडणीसाठी पैसे देण्याची गरज नाही तो ऊस शेतकरी कोणालाही फुकटात देऊ किंवा त्याचे गुळ करू, पण शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी घाई गडबडीत ऊस कापणी करून लैलाची थैली मोठी केली. यात काय दडले तेही कळण्यास कठीण झाले आहे.
ऊस तोडणीसाठी परराज्यातून आणलेल्या ऊस तोडणी टोळ्यांचा हिशेब व्यवस्थित करण्यात आला नाही. त्यांना दरवर्षी कमिशन देण्यात येत होते. इतर सुविधा संजीवनी कारखाना देत असे. मात्र, यंदा त्यांना काहीच न देता आल्या पावली परत पाठविण्यात आले. येत्या हंगामात परत या महामारीच्या प्रसंगात ऊस तोडणीसाठी मजूर येण्याची शक्यता कमीच आहे. प्रीतम हरमलकर हा ऊस वाहतूक कंत्राटदार असून येत्या गणेशचतुर्थीपूर्वी सर्व थकीत रक्कम चुकती करण्याची मागणी ऊस वाहतुकदारानी केली आहे.
 

संबंधित बातम्या