दिल्लीतील डॉलर्स चोरीप्रकरणी अम्रिता सेठीसह दोघे गजाआड

दैनिक गोमंतक
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

तिने ही रक्कम गाडीत ठेवली असल्याचे सांगून त्या कार्यालयातील व्यक्तीला ३३०० डॉलर्स गाडीपर्यंत घेऊन येण्यास सांगितले. तो तेथे आला असता त्याला ढकलून ती व तिच्या साथीदाराने ३३०० डॉलर्स घेऊन पसार झाले होते.

पणजी: दिल्ली येथे यूएसडी डॉलर्सची चोरी करून गोव्यात आलेल्या व्यावसायिक पोकर खेळाडू अम्रिता सेठी (२७) व तिचा साथीदार अक्षत झांब या दोघांना हडफडे येथील एका तारांकित हॉटेलात आज पहाटेच्या सुमारास गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने शिताफीने अटक केली. तिची गाडीही जप्त करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडून तीन दिवसांची ट्रान्झिट वॉरंट परवानगी घेतली व संशयितांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले. 

क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अम्रिता सेठी हिने दिल्ली येथील एका फॉरेन एक्स्चेंजमध्ये ३३०० डॉलर्स भारतीय चलनी नोटाच्या बदल्यात आणण्यासाठी गेली होती. तिने ही रक्कम गाडीत ठेवली असल्याचे सांगून त्या कार्यालयातील व्यक्तीला ३३०० डॉलर्स गाडीपर्यंत घेऊन येण्यास सांगितले. तो तेथे आला असता त्याला ढकलून ती व तिच्या साथीदाराने ३३०० डॉलर्स घेऊन पसार झाले होते. ही घटना दिल्ली येथे ५ नोव्हेंबरला घडली होती. त्यानंतर हे दोघे गाडीने गोव्यात गेल्याचा संशय दिल्ली पोलिसांना होता कारण ती एक व्यवसायिक पोकर खेळाडू असल्याचे तपासात उघड झाले होते. 

या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांनी गोव्यातील क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे क्राईम ब्रँचची तीन वेगवेगळी
पथके पोलिस निरीक्षक राहुल परब, निरीक्षक अनंत गावकर व निरीक्षक व निरीक्षक सुदेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तैनात करण्यात आली. संशयितांकडे असलेल्या गाडीचा क्रमांक दिल्ली पोलिसांनी पाठविला होता त्याच्या आधारे या संशयितांचा शोध सुरू झाला. दिल्ली चोरी करून गोव्यात आल्याची व कसिनोवर ते गेल्याचे क्राईम ब्रँचने केलेल्या तपासणीत उघड झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टी भागामध्ये गाडीचा शोध घेण्यात येत होता. काल पहाटेच्या सुमारास संशयितांची गाडी हडफडे येथील एका तारांकित हॉटेलच्या बाहेर पार्क केलेली आढळून आली. ही माहिती वरिष्ठ पोलिसांना देण्यात येऊन पूर्णतयारीनिशी या हॉटेलात क्राईम ब्रँचच्या पथकानी छापा टाकला. त्या दोघाना हॉटेलातील एका खोलीतून ताब्यात घेण्यात आले.

संबंधित बातम्या