मडगावात १३.५ लाखांचा गांजा जप्त

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पथकाने काल मध्यरात्री मडगावात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तिघा ड्रग्ज दलालांना अटक केली.

 पणजी: अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या (एएनसी) पथकाने काल मध्यरात्री मडगावात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तिघा ड्रग्ज दलालांना अटक केली. या कारवाईवेळी सुमारे १३.५० किलो मारिजुआना (गांजा) जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे १३.५० लाख रुपये आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खारेबांध - मडगाव येथील मुहाफिज ईस्माईल पठाण याला रात्री अकराच्या सुमारास मडगाव कदंब बसस्थानकाच्या परिसरात संशयास्पद फिरताना आढळून आला. त्याच्या खांद्यावरील बॅगेची झडती घेतली असता १.३३ किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे १ लाख ३३ हजार रुपये आहे. त्याच्याकडील एक मोबाईल व केटीएम दुचाकीही जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास प्रितेश माडगावकर करत आहेत. 

रात्री ४ वाजता पहाटेच्या सुमारास माजोर्डा - सालसेत येथील बसथांब्याच्या ठिकाणी एक कार उभी असलेली दिसली. कार चालक मिलेन कुमार पिल्ले याची चौकशी सुरू झाल्यावर तो गोंधळलेला दिसला. पोलिसांना संशय आल्याने त्याची कारची झडती घेण्यात आली. या तपासणीवेळी त्याचा कारमध्ये १०.३१० किलो गांजा सापडला. काळ्या रंगाच्या पोलिथिन बॅगेत हा गांजा गुंडाळण्यात आला होता. पोलिसानी त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली. त्याची कार व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. उपनिरीक्षक मोहन माडगावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

कोंबा - मडगाव येथील विनायक दिगंबर जुवारकर याच्याकडून २ किलो मारिजुआना जप्त करण्यात आला. तीन वेगवेगळे गुन्हा नोंद करून तपास सुरू आहे. गेल्या काही महिन्यापासून राज्यात मारिजुआना (गांजा) या ड्रग्जची मोठ्या प्रमाणात विक्री असल्याचे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यांवरून आढळून येत आहे.

संबंधित बातम्या