...आणि चर्चेच्या केंद्रस्थानी उत्पल पर्रीकर

अवित बगळे
शनिवार, 25 जुलै 2020

राजकीय सक्रियता निष्ठावंतांना भावली, तर काहीजणांमध्‍ये अस्‍वस्‍थता

पणजी

पणजीचे आमदार आतानासिओ मोन्सेरात हे रक्तदाब वाढल्‍यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल होणे आणि उत्पल मनोहर पर्रीकर यांनी सक्रिय होणे, हा निव्वळ योगायोग असावा का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी पर्रीकर यांची काल भेट घेतली आणि आज पर्रीकर यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतरही उत्‍पल पर्रीकर यांच्या पणजीत भेटीगाठी सुरू होत्या. उत्‍पल यांचे सक्रिय होणे भाजपच्या निष्ठावंत, जुन्या नेत्यांना भावलेले असले, तरी काहींच्या पोटात मात्र यामुळे आताच गोळा उठला आहे.

संपर्क वाढवण्‍यावर भर
उत्‍पल यांनी पणजीतील स्व. मनोहर पर्रीकर यांना मानणाऱ्या, पण मूळ भाजप विचारधारेतील नसलेल्यांना भेटावे, त्यांच्यांशी संवाद साधावा, अशी मोहीम भाजपच्याच काही ज्येष्ठ नेत्यांकडून हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार गेले सहा महिने उत्‍पल हे काहीजणांच्या घरी जाऊन थेट संवाद साधत आहेत. टाळेबंदीच्या काळात पणजीतील रोजंदारीवर काम करणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासल्यानंतर उत्‍पल यांनी मडगावातून किराणा माल आणून तो व्यवस्थित पॅक करून त्याचे नियोजनबद्ध वितरणही केले होते. ते सार्वजनिक जीवनात फारसे सक्रिय नाहीत, असे वरवर वाटत असले, तरी त्यांनी पणजी मतदारसंघात आपले व्यवस्थित बस्तान बसवले आहे.

दिल्ली श्रेष्‍ठींकडूनही सक्रियतेचा संदेश!
गेल्या काही दिवसांपूर्वी स्व. मनोहर पर्रीकर यांना मानणाऱ्या भाजपच्या निष्ठावान नगरसेवकांसोबतही उत्पल यांची बैठक झाली आहे. दिल्लीतील भाजपच्या काही बड्या नेत्यांनाही उत्पल यांनी गोव्याच्या समाजकारणात आणि राजकारणात लक्ष घालावे, असे वाटते. त्यांनीही त्यांच्याशी थेटपणे संपर्क साधून सक्रिय व्हा, असा संदेश दिला आहे.

‘कोविड’चा बाका प्रसंग आणि पर्रीकर असते तर...
राज्यभरात ज्या पद्धतीने ‘कोविड’ नियंत्रणासाठी सरकारने धरसोड वृत्ती अंगीकारली आहे. त्यामुळे आज स्व. पर्रीकर असते तर..., असा विचार प्रत्येक गोमंतकीयांच्या मनात आल्यावाचून राहवत नाही. त्याचमुळे उत्पल यांनी राजकारणात यावे, राज्याची धुरा सांभाळावी असे वाटणारा एक मोठा वर्ग राज्यभरात आहे. कोविड महामारीवर अँटीबॉडी चाचणी हा उपाय होऊ शकतो, असे दीड महिन्‍यांपूर्वी उत्‍पल यांनी सांगितले होते. हा विषय आता सरकारला पटला आहे. त्‍यानंतर अशा चाचण्‍या सुरू केल्‍या आहेत. ‍स्व. पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटलेला जनसागर पाहिल्यास किती मोठा वर्ग स्व. पर्रीकर यांचा चाहता आहे, हे लक्षात येते. त्या सर्वांनाच मनोमनी उत्पल हेच आता राज्याचे तारणहार ठरतील, असे वाटत आहे. पणजी पोटनिवडणुकीत उमेदवारी नाकारूनही ज्या संयमाने ते परिस्थितीला सामोरे गेले. त्यातून त्यांनी परिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. आताही त्याच पोक्तपणे ते समाजकारण आणि राजकारणात वावरतील, अशी अनेकांची अपेक्षा आहे.

कांदोळकर भेटीत उत्‍पल यांच्या राजकीय परिपक्वतेचा प्रत्‍यय
थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी उत्पल यांची भेट घेतल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. कांदोळकर यांनी अलीकडेच हळदोणे ग्रामपंचायतीत जाऊन नव्या सरपंचांसोबत आपण हळदोण्यातून लढणार, असे जाहीर केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकावले, पण फलकावर स्व. मनोहर पर्रीकर यांचे छायाचित्र कायम ठेवले होते. कांदोळकर यांनी आपण नव्या प्रादेशिक पक्षाच्या स्थापनेविषयी उत्पल यांच्याशी चर्चा केल्याचे म्हटले. मात्र, उत्पल यांनी राजकीय परिपक्वता दर्शवत कांदोळकर यांनी आपल्या वडिलांनी (स्व. मनोहर पर्रीकर) यांनी वाढवलेल्या पक्षासाठीच काम करण्याची गरज व्यक्त केल्याचे नमूद केले आहे.

मुल्याधिष्ठीत राजकारण मला करायचेय!
याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी अपात्रता जवळ आल्याने इस्पितळात जाऊन झोपणाऱ्यांपैकी समजला की काय? अशी विचारणा करून ते म्हणाले, मी स्व. मनोहर पर्रीकर यांचा मुलगा आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र आणून पक्ष बांधणी केली. त्यापैकी काहींना मला भेटायचे असेल, तर त्यांचे म्हणणे मी ऐकून घेतलेच पाहिजे. नाहीतर राजकारण कसले करायचे. मी कांदोळकर यांना पक्षाच्या चौकटीत जनतेची कामे करत राहा, असे सांगितले आहे. त्यांना भेटलो म्हणून कसलाही वाद होता कामा नये. मी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत चालणारा आहे. मुल्याधिष्ठीत राजकारण मला करायचे आहे. सध्याच्या राजकारणावर मी बोलणार नाही. आम्हाला ‘कोविड’विरोधात लढायचे आहे. केवळ भाजीविक्रीच्या दुकानाचे छायाचित्र प्रसिद्ध करून गोमंतकीय उद्योजक झाले, असे म्‍हणता येणार नाही. मी व एक दोन अभियंते सोडले तर बाकीचे राज्य सोडून गेले आहेत. हा स्मार्ट फोन गोव्यात का तयार होऊ शकत नाही, याचा विचार झाला पाहिजे.

चर्चा करणे आणि निर्णय घेणे हे भिन्न : लोबो
या भेटीबाबत ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो यांना विचारले असता ते म्हणाले, पर्रीकर आमच्या पर्राचे. उत्पल हे कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. कोणीही जाऊन कोणासोबत छायाचित्र काढू शकतो. कांदोळकर यांना पक्ष स्थापन करायचा झाल्यास ते मोकळे आहेत. पण, त्यात उत्पल असणार नाहीत. उत्पल हे स्व. मनोहर यांचे पूत्र ते योग्य तोच निर्णय घेतील. चर्चा करणे आणि निर्णय घेणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. भाजपमध्ये आमदार आयात केल्याने नाराजी असणे साहजिक आहे. पण, उमेदवारी देताना निवडून येणे हाच निकष असेल. मागील खेपेस काहीजण पराभूत होतील, असे मी सांगत असतानाही पक्षाने ऐकले नाही. आता पक्ष ऐकेल असे वाटते.

संबंधित बातम्या