हणजूण मारामारीतील ‘त्या’ जखमीची स्थिती चिंताजनक

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

बुधवारी दुपारी चिवार येथील वखारीत लाकूड खरेदीवरून झालेल्या भांडणात आंतोनियो डिसौझा तसेच त्यांच्या सहकार्याकडून पटेल यांच्यावर सर्वप्रथम हल्ला करण्यात आला होता, असे भरत पटेल या वखार चालक असलेल्या दयालाल पटेल यांच्या पुतण्याने स्थानिक प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

शिवोली: हणजुण-चिवार येथील सरस्वती सॉ-मीलचे चालक दयालाल पटेल तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना स्थानिक तरुणांकडून झालेल्या मारहाणी संदर्भात हणजुण पोलिसांकडून आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी फर्मावण्यात आल्याचे हणजुण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुरज गांवस यांनी सांगितले. 

या प्रकरणात हणजुण पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याची रवानगी मेरशी येथील  अपना घरात करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी चिवार येथील वखारीत लाकूड खरेदीवरून झालेल्या भांडणात आंतोनियो डिसौझा तसेच त्यांच्या सहकार्याकडून पटेल यांच्यावर सर्वप्रथम हल्ला करण्यात आला होता, असे भरत पटेल या वखार चालक असलेल्या दयालाल पटेल यांच्या पुतण्याने स्थानिक प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

या मारामारीत जबर जखमी झालेल्या दयालाल पटेल यांच्या प्रकृतीत अद्याप  सुधारणा दिसून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेशी संबंधित आंतोनियो डिसोझा, एलन डिसौझा, फेबीयन गोहार, सुरेश पुजारी, ज्योवीन रॉड्रिग्ज, अझर शेख, इम्रान खान तसेच श्रीमती शेर्वॉट डिसौझा सध्या सात दिवसांच्या रिमांडवर हणजुण पोलिसांच्या ताब्यात असून या मारहाण प्रकरणात सहभागी एका अल्पवयीन मुलाची मेरशीच्या अपना घरात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बुधवारी दुपारी हणजुणातील हाणामारी प्रकरणाची तक्रार वखारमालक वाटू गोवेकर यांच्याकडून हणजुण पोलिसांत दाखल होताच, पोलिस निरीक्षक सुरज गांवस तसेच उपनिरीक्षक पार्सेकर आणि कोरगांवकर यांच्यासहित स्थानकातील आठ ते दहा पोलिस कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे गट करून तसेच सरकारी गाडीचा (पोलिस जीपचा ) बिल्कुल वापर न करता रात्री उशिरापर्यंत सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात यश मिळविले होते.

तथापि, पोलिसांकडून या घटनेत थोडी जरी हयगय अथवा उशीर झाला असता तर ताब्यातील संशयितांपैकी तीन संशयित आरोपी गोव्यातून पलायन करण्याच्या तयारीत होते, असे सूत्रांकडून कळाले. राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून हणजुण पोलिसांचे याबाबतीत कौतुक होणे आवश्यक असल्याचे मत या भागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच समर्थन संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात सध्या चोऱ्या खून मारामारीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांना आवश्यक बळ तसेच अधिक अधिकार देण्याची मागणी कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर, तसेच शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष अमृत आगरवाडेकर यांच्याकडून करण्यात आली आहे. संबंधित संस्थांचे पदाधिकारी लवकरच याबाबतीत उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तसे निवेदन सादर करणार असल्याचे समर्थन संघटना, शिवोलीचे संस्थापक निलेश वेर्णेकर यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या