हणजूण रेव्ह पार्टीप्रकरण: शैलेश शेट्टीच्या पोलिस कोठडीत वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

संशयित व सनबर्न क्लासिक सहआयोजक शैलेश शेट्टी याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे तर संशयित झवेरी व तीन विदेशी महिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

पणजी: हणजूण येथील रेव्ह पार्टीप्रकरणी क्राईम ब्रँच पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. संशयित कपिल झवेरी याला भाडेपट्टीवर दिलेल्या ‘फिरंगी पानी’ बंगल्याच्या मालकाची जबानी नोंद करण्यात आली आहे. या रेव्ह पार्टीबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे त्याने जबानीत सांगितले आहे. याप्रकरणातील संशयित व सनबर्न क्लासिक सहआयोजक शैलेश शेट्टी याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे तर संशयित झवेरी व तीन विदेशी महिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. 

संशयित कपिल झवेरी याने जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी येत्या सोमवारी २४ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे. संशयित शैलेश शेट्टी याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून त्यावरील निकाल उद्या २२ ऑगस्टला ठेवला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी क्राईम ब्रँचला दिल्या आहेत. ही रेव्ह पार्टी आयोजनामागे संशयित शेट्टी व झवेरी यांचे कटकारस्थान असल्याचे तपासात समोर आले आहे. या संशयितांचे गोव्यातील अनेकजणांशी जवळचे संबंध असल्याने त्याचा तपास सुरू आहे. या पार्ट्यांमधून ‘मनी लॉँडरिंग’चा प्रकार झाला आहे का या दिशेनेही चौकशी सुरू झाली आहे. 

या रेव्ह पार्टीवरून भाजप सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका होत आहे. या प्रकरणामध्ये अनेक राजकारणी व ड्रग्ज माफिया गुंतलेले असल्याने त्याची चौकशी सीबीआय किंवा स्वतंत्र तपास यंत्रणेकडे देण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. किनारपट्टी परिसरातील अनेक बंगले (व्हिला) परप्रांतियांनी खरेदी करून ते भाडेपट्टीवर दिले आहेत. या बंगल्यांचा रेव्ह पार्टीसाठी वापर केला जातो मात्र स्थानिक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप थिवी मतदारसंघातील आमदारांनी केला आहे. संशयित कपिल झवेरी याने ही वैयक्तिक पार्टी असल्याचे जबानीत सांगितले असले तरी छाप्यावेळी त्याच्याकडे तसेच विदेशी तीन महिलांकडे ड्रग्ज सापडल्याने तो अडचणीत आला आहे. या तीन विदेशी महिलांचा ड्रग्ज माफियांशी संबंध आहेत का याचाही तपास पोलिसांनी चालविला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या