गोव्यातील जीवरक्षकांचे आंदोलन सुरूच

दैनिक गोमंतक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

जीवरक्षकांनी आज सकाळी दोनापावल येथील दृष्टी कंपनीच्या कार्यालयाला धडक दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांनी कंपनीला सेवा दिलेल्या वर्षांची ग्रॅच्युएटी तसेच इतर थकबाकी देण्याची मागणी केली. 

पणजी': गेल्यावर्षीच्या आंदोलनानंतर जीवरक्षकांना सामावून घेण्याचे आश्‍वासन पर्यटन खात्याने दिले होते. त्याची पूर्तता न केल्याने गेल्या आठवड्यापासून धरणे आंदोलन सुरू केलेल्या जीवरक्षकांनी आज सकाळी दोनापावल येथील दृष्टी कंपनीच्या कार्यालयाला धडक दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांनी कंपनीला सेवा दिलेल्या वर्षांची ग्रॅच्युएटी तसेच इतर थकबाकी देण्याची मागणी केली. 

जीवरक्षकांनी त्यांच्या सेवेची थकबाकी त्वरित देण्याच्या घोषणा दिल्या. अखिल गोवा मरिन लाईफसेव्हिंग सुरक्षा संघटनेच्या अध्यक्षा स्वाती केरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दृष्टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जीवरक्षकांच्या सेवेतील ग्रॅच्युएटी तसेच कपंनीने त्यांच्या वेतनातून सहकारी पतसंस्था सदस्य, भागभांडवल तसेच वेळोवेळी विविध कारणासाठी कपात केलेली रक्कम देण्याची मागणी करण्यात आली. गेल्यावर्षी संपावर गेल्यावर कंपनीने त्या महिन्याचे वेतन दिले नाही ते द्यावेत. जीवरक्षक सेवा केल्याचे प्रमाणपत्र द्यावे. यावेळी अधिकाऱ्यांनी आश्‍वासन दिले की जीवरक्षकांच्या हिशोबाचा प्रश्‍न येत्या १५ डिसेंबरपर्यंत सोडविला जाईल. 

स्वाती केरकर म्हणाल्या की, गेल्या १४ महिन्यांपासून संपावर असलेल्या जीवरक्षकांचा प्रश्‍न सरकारने सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते मात्र त्याबाबत गंभीर नाही. या जीवरक्षकांना गोवा पर्यटन विकास महामंडळामध्ये सामावून घेण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम खात्यानुसार पर्यटन खात्याने कर्मचाऱ्यांची संस्था करून त्यामध्ये समावेश करावा. काहींचे वय ४० पेक्षा अधिक आहे त्यांनाही सेवेत घेतले जावे. जीवरक्षक सेवा ही ४५ वर्षापर्यंतच आहे त्यामुळे त्यानंतर या जीवरक्षकांना सेवेचा पर्याय देण्यात यावा, असे त्या म्हणाल्या. 

आणखी वाचा:

संबंधित बातम्या