साळ येथील भजनी सप्ताहाची समाप्ती

वार्ताहर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

डिचोली तालुक्यातील साळ येथील श्री महादेव भूमिका पंचायतन देवस्थानचा दीड दिवसीय वार्षिक भजनी सप्ताह उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडला. भाद्रपद कृष्ण इंदिरा एकादशीला या उत्सवास प्रारंभ झाला आणि द्वादशीला समाप्ती झाली. 

साळ: डिचोली तालुक्यातील साळ येथील श्री महादेव भूमिका पंचायतन देवस्थानचा दीड दिवसीय वार्षिक भजनी सप्ताह उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडला. भाद्रपद कृष्ण इंदिरा एकादशीला या उत्सवास प्रारंभ झाला आणि द्वादशीला समाप्ती झाली. 

रविवार ता. १३ रोजी दुपारी वरचावाडा येथील श्री सिद्धेश्वर मंदिराकडून श्री विठ्ठलाच्या पालखीची मिरवणूक ढोल ताशा गजराच्या साथीने पालखीचे कार्यक्रमस्थळी भूमिका मंदिरात आगमन झाले. त्‍यानंतर बारा वाजण्याच्या सुमारास प्रती तीन तासात (प्रहाराने) पार नंबर १ ते पार नंबर ५च्या वतीने अखंडित विठ्ठल जपाला सुरवात झाली. समोर भलीमोठी फुलांनी सुशोभित समई प्रज्वलित करून ठेवली तर खांद्यावर वीणा घेऊन विणाधारी बसला होता. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी विणारूपी विठ्ठलाला पुष्पहार वाहिले. रात्री नंबर एक याप्रमाणे पारंपरिक स्थानी स्थानिक भजनी कलाकारांनी अभंग सादर केले. त्यानंतर चित्ररथ कार्यक्रमस्थानी आणला. तसेच पार क्रमांच्‍या २च्या वतीने पारंपारिक जागेवर चित्ररथ सजवला व चित्ररथातील श्री विठ्ठल मूर्तीची पूजा केली. तेथे पार क्रमांक २च्‍या भाविकांनी घुमट आरती सादर केली. तत्पूर्वी पुरोहित यशवंत गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाजन विश्वनाथ परब यांच्या हस्ते पार क्रमांक २च्‍या कार्यालयातील श्रीफळ विधीवत बदलले.

दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता पुन्हा सिद्धेश्वर मंदिराकडून श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्‍यात आली. त्‍यानंतर  पिंपळ वृक्षाच्या फांदीला बांधलेली दहीहंडी फोडण्यात आली. त्‍यानंतर समाज अंतर राखून भाविकांनी ढोल-ताशाच्या साथीने टाळ्यांच्या गजरात मंदिरा जवळून वाहणाऱ्या पारंपरिक स्थानी ओहोळात विणारूपी विठ्ठलाचे विसर्जन केले. त्‍यानंतर भूमिका देवीच्या गर्भकुडीला जयघोषात पाच प्रदक्षिणा काढल्यानंतर सार्वजनिक गाऱ्हाणे पुरोहित यशवंत गाडगीळ यांनी घातले. त्‍यानंतर भाविकांना तीर्थ व पंचखाद्याचे वाटप करण्यात आले आणि भजनी सप्ताहाची सांगता झाली. समाप्तीनंतर देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत यांनी भजनी सप्‍ताहात सर्वांच्‍या सहकार्याने उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडल्‍याचे सांगितले. सरकारच्या नियमावलीचे पालन करून व समाज अंतर राखून सप्‍ताह पार पडल्‍याचे कालिदास राऊत यांनी सांगितले. देवस्थान मंडळाचे सचिव - विशाल परब, उपाध्यक्ष- सगुण राऊत, उपसचिव- नीलेश परब, खजिनदार- यशवंत राऊत, उपखजिनदार- उमेश राऊत, मुखत्यार- विश्वनाथ परब व उपमुखत्यार - दत्ताराम परब यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवरांची उपस्‍थिती होती. goa

संबंधित बातम्या