कोळसाविरोधी आंदोलनास जातीयवादी रंग: लोलयेकर

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

कोळसा विरोधी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या लंडनमधील गोमंतकीयांना हिणवून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आंदोलनास जातीयवादी रंग देऊ पाहात आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी केला.

मडगाव : कोळसा विरोधी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या लंडनमधील गोमंतकीयांना हिणवून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आंदोलनास जातीयवादी रंग देऊ पाहात आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी केला.

जनभावना ओळखून कोळसा वाहतुकीसाठी सुरू असलेले रेलमार्ग दुपदीरकणाचे काम बंद न केल्यास गोवा फॉरवर्ड या आंदोलनात सक्रीय सहभागी होणार आहे, असा इशारा लोलयेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. कोळसा नको अशी भूमिका घेत बिगर सरकारी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. जनतेला नको असलेले प्रकल्प लादण्याचा सरकारने प्रयत्न करू नये. असा प्रयत्न झाल्यास गोवा फॉरवर्ड आंदोलक संघटनांना पाठिंबा देण्यासाठी या आदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले.

कुंकळ्ळी येथे मुख्यमंत्र्यांनी लंडनमधील गोमंतकीयांना हिणवणारे वक्तव्य केले, तेव्हा मत्स्योद्योगमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज व कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर या नेत्यांनी आपले मत स्पष्ट करावे, असे लोलयेकर यांनी सांगितले.  कोळसाविरोधी आंदोलनात एकाच धर्मचा नव्हे, तर सर्व धर्माचे लोक सहभागी झाले आहे. जातीयवादी रंग देऊन या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असे मतही लोलयेकर यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या