राज्यात आता ‘अँटीबॉडी टेस्ट’

dainik gomantak
मंगळवार, 7 जुलै 2020

मागोरहिल येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथील कनटेन्मेंट झोन तूर्त मागे न घेता आणखी १५ दिवस कायम ठेवण्यात येणार आहे मात्र अत्यावश्‍यक वस्तूंसाठी तेथील किराणा माल दुकाने, दूध केंद्रे, भाजीपाला, स्वस्त धान्य दुकाने तसेच फार्मसी खुल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पणजी

कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढून फैलाव होत असल्याने राज्यात ‘अँटीबॉडी टेस्ट’ सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील पहिला कनटेन्मेंट झोन असलेल्या मांगोरहिलपासून त्याची सुरुवात केली जाईल. या चाचणीमुळे व्यक्ती कोरोना पोझिटिव्ह की नेगटीव्ह आहे हे कळेलच शिवाय त्याची प्रतिकारशक्तीची क्षमता जाणून घेऊन आवश्‍यक ते उपाय करण्यास मदत होईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 
राज्यात मांगोरहिल येथून कोरोनाचा प्रसार वाढल्याने तो परिसर कनटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला त्याला ३५ दिवस झाले त्यामुळे तेथील रहिवाशांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्येमुळे आज पर्वरी येथील सचिवालयात मुरगाव तालुक्यातील आमदार, नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची आज बैठक झाली. यामध्ये वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार कार्लोस आल्मेदा तसेच आमदार एलिना साल्ढाणा व मुरगाव पालिका नगराध्यक्ष दिपक नाईक उपस्थित होते. 
या बैठकीनंतर माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, मांगोरहिल स्थानिकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. मागोरहिल येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथील कनटेन्मेंट झोन तूर्त मागे न घेता आणखी १५ दिवस कायम ठेवण्यात येणार आहे मात्र अत्यावश्‍यक वस्तूंसाठी तेथील किराणा माल दुकाने, दूध केंद्रे, भाजीपाला, स्वस्त धान्य दुकाने तसेच फार्मसी खुल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या भागातील लोकांना किराणा मालाच्या वस्तू वगळता इतर जीवनावश्‍यक वस्तू मोफत देण्याची तरतूद करण्यात येणार असून त्याची यादी तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या झोनमधील साफसफाईची व्यवस्थाही तेथील कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार आहे असे ते म्हणाले. 
या परिसरातील अनेकजण रोजंदारीवर काम करणारे तसेच काहीजण कंपन्यांमध्ये कामाला आहेत त्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी
ज्यांना कनटन्मेंट झोनमधून बाहेर पडून नोकरीला किंवा व्यवसायासाठी जायचे आहे त्याला स्वतःची कोविड - १९ चाचणी करून घ्यावी लागेल. ही चाचणी त्याला सक्तीची असेल. त्याची ही चाचणी नेगेटिव्ह आली तर त्याला या ‘झोन’मधून बाहेर पडता येईल मात्र पुन्हा परत त्याला या झोनमध्ये राहत्या घरी जाता येणार नाही. त्यासाठी त्याला ‘कनटन्मेंट झोन’ बाहेर राहण्याची पर्यायी व्यवस्था स्वतःलाच करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित सर्व रुग्ण बरे होऊन गोवा ग्रीन झोनमध्ये होता मात्र मांगोरहिल येथे कोरोना बाधित रुग्ण साडपला व त्याचा फैलाव झपाट्याने झाल्याने हा परिसर ‘कनटन्मेंट झोन’ घोषित करण्यात आला. आतापर्यंत या भागात सुमारे २५० हून अधिक
कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. या झोनमुळे तेथील स्थानिकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्याची पूर्ण कल्पना  असू त्याबाबत सरकार संवेदनशील आहे. या मांगोरहिलमध्ये सुमारे आठ हजारांहून अधिक लोकांची संख्या आहे त्यापैकी आतापर्यंत सुमारे दोन हजारजणांची कोविड - १९ चाचणी करण्यात आली आहे. दरदिवशी राज्यात सुमारे २३०० व्यक्तींच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये राज्याबाहेरून आलेले तसेच कोरोना बाधित सापडलेल्या परिसरातील सभोवतालच्या भागातील लोकांचा समावेश असतो. या चाचण्यांचा अहवालही त्वरित घोषित करण्याचा प्रयत्न आरोग्य खात्याकडून केला जात आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 
राज्यात कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरुवातीला मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री हे आघाडीवर होते मात्र गेल्या कोरोनाचा फैलाव वाढल्याने आरोग्य व पोलिस यांच्यापाठोपाठ सरकारमधील मंत्र्यांनाही या लढ्यात फ्रंटलाईनवर उतरविण्यात आले आहे. सामाजिक अंतर तसेच मास्क यासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता करण्याबरोबरच कार्यक्रमांना उपस्थिती न लावण्याच्या सूचना बैठका घेऊन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली आहे. 

कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये ‘लॉकाडऊन पार्टी’ आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये हळदोणेचे सत्ताधारी भाजपचे आमदार ग्लेन टिकलो यांच्यासह म्हापसा पालिकेचे नगरसेवक सामील झाले होते. या पार्टीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या पार्टीमध्ये सामाजिक अंतर तसेच मास्कचा वापर करण्यात आला नव्हता. मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 
 

संबंधित बातम्या