राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी नामांकन अर्जाचे आवाहन

प्रतिनिधी
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

भारतीय बाल कल्याण मंडळ, नवी दिल्ली यांच्यातर्फे शौर्याचे काम केलेल्या मुलांची दखल घेऊन, त्यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून, इतर मुलांना प्रेरणा मिळावी या दृष्टीने ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार (२०२०)’ सुरू करण्यात आला आहे.

पणजी:  भारतीय बाल कल्याण मंडळ, नवी दिल्ली यांच्यातर्फे शौर्याचे काम केलेल्या मुलांची दखल घेऊन, त्यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून, इतर मुलांना प्रेरणा मिळावी या दृष्टीने ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार (२०२०)’ सुरू करण्यात आला आहे. आपला जीव धोक्यात घालून किंवा शारीरिक जखमांचा धोका असतानाही उत्स्फुर्तपणे नि:स्वार्थ सेवा बजावलेल्या आणि किंवा सामाजिक दुष्ट प्रवृत्ती/गुन्ह्याविरोधात धैर्य व धाडस दाखविणारे काम केलेल्या मुलांना हा पुरस्कार देण्यात येतो. 

पुरस्कारासाठीचे नामांकन, विहित अर्ज नमुन्यात सादर करणे गरजेचे आहे जे, आयसीसीडब्लू मुख्यालयाच्या कार्यालयातून घेतले जाऊ शकतात किंवा आयसीसीडब्लूच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केले जाऊ शकतात. दोन सक्षम प्राधिकारींनी अर्जाची शिफारस केली पाहिजे. अर्जदाराने बजावलेल्या कामगिरीचे तपशील देणारा सुमारे २५० शब्दांचा लेख, जन्मतारखेचा दाखला आणि वृत्तपत्राचे/मॅगझिनचे कात्रण आणि/किंवा प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) किंवा पोलीस स्थानकात भरलेली पोलीस डायरी अर्जासोबत जोडली पाहिजे. दोन सक्षम प्राधिकार्‍यांनी, घटनेचा अहवाल तसेच सहायक कागदपत्रांचे शक्यतो समर्थन केले पाहिजे.
 
अर्जदार शिकत असलेल्या शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक किंवा, पंचायत/जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा राज्य बाल कल्याण मंडळाचे अध्यक्ष किंवा महासचिव, जिल्हाधिकारी/जिल्हा दंडाधिकारी/समकक्ष श्रेणीचे सरकारी अधिकारी किंवा त्या क्षेत्राचे पोलीस अधीक्षक किंवा उच्च श्रेणीचे पोलीस अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असू शकतात. या पुरस्कारासाठी १ जुलै २०१९ व ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत घडलेल्या घटना विचारात घेतल्या जातील. 

पदक (सुवर्ण, रौप्य), प्रमाणपत्र, रोख बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार विजेत्यांना परोपकारी संस्थांतर्फेही भेटवस्तू दिल्या जातील. नवी दिल्ली येथे प्रख्यात व प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
 
पुरस्काराचे तपशील पुढीलप्रमाणे:- आयसीसीडब्ल्यू भारत पुरस्कार: रू. १,००,०००/- आयसीसीडब्ल्यू ध्रुव पुरस्कार: रू. ७५,०००/-, आयसीसीडब्ल्यू मार्कंडेय पुरस्कार: रू. ७५,०००/-, आयसीसीडब्ल्यू श्रावण पुरस्कार: रू. ७५,०००/-, आयसीसीडब्ल्यू प्रल्हाद पुरस्कार: रू. ७५,०००/-, आयसीसीडब्ल्यू एकलव्य पुरस्कार: रू. ७५,०००/- आणि सर्वसामान्य पुरस्कार : रू. ४०,०००/-.

पात्र पुरस्कार विजेत्यांना त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक साहाय्य देण्यात येते आणि शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पदवी/पदव्युत्तर/व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आर्थिक साहाय्य देण्यात येते.
 
पात्र मुलांनी, उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील त्याचा/तिचा अर्ज २१ सप्टेंबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी, सॉफ्ट कॉपी (वर्ड स्वरूपात सीडी/पेन ड्राईव्ह) आणि हार्ड कॉपी अशा स्वरूपात महिला व बाल कल्याण संचालनालय, गोवा येथे सादर करावा, किंवा www.iccw.in या आयसीसीडब्लूच्या संकेतस्थळावर लॉगइन करावे. अधिक माहितीसाठी कृपया, महिला व बाल कल्याण संचालनालयाशी २२३५३०८/२४२६११२ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या