‘संजीवनी’च्या प्रमुखपदी नरेंद्र सावईकर यांना नेमा!

प्रतिनिधी
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

सुदिन ढवळीकर : योग्य नियोजन करा, संजीवनी कृषी खात्यांतर्गत आणण्याच्या निर्णयाचे स्वागत 

फोंडा: राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मगो पक्षाचे पहिले मुख्यमंत्री तथा गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांनी उभारलेला संजीवनी साखर कारखाना बंद न करता, योग्य नियोजन करून हा कारखाना नूतनीकरण करून पुन्हा सुरू करावा व ऊस उत्पादनाला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. नव्या जोमाने संजीवनी सुरू करण्यासाठी कृषिविषयक जाणकार तसेच माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांची संजीवनीच्या प्रमुखपदी नेमणूक करावी आणि तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी नेमून त्यांच्या सहकार्याने संजीवनीत आमुलाग्र बदल घडवून आणावेत, अशी मागणीही सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. 

राज्यात आजपर्यंत जेवढ्या राजकीय पक्षांची सरकारे आली, त्यातील कोणत्याही मुख्यमंत्री अथवा सहकारमंत्र्याने संजीवनी बंद करण्याचा कधीच निर्णय घेतला नाही. मात्र आताच या संजीवनीबाबत लेचीपेची धोरणे घेतली जातात, की काय अशा शंका वाटत असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संजीवनी साखर कारखाना कृषी खात्यांतर्गत आणण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. 

राज्यातील कृषीधन वाढीसाठी पेडणे ते काणकोणपर्यंत जर कृषी खात्यातर्फे व्यवस्थित प्रयत्न झाले तर ऊस उत्पादनही वाढू शकेल, आणि संजीवनीही नफ्यात येऊ शकेल. गेला बराच काळ संजीवनी तोट्यात आहे. यापूर्वीही आपण मंत्रीपदी असताना संजीवनी बंद करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती, त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याशी आपण बोलणी करून संजीवनी सुरूच ठेवून नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न चालवले होते, त्याची आठवण ढवळीकर यांनी करून दिली. आताही संजीवनी बंद ठेवू नये, किंवा अन्य साखर कारखान्यांना भाडेपट्टीवर देऊ नये अथवा ‘पीपीपी’ तत्त्वावर न चालवता, सरकारने नरेंद्र सावईकर यांच्या प्रमुखपदाखाली संजीवनीत आमुलाग्र बदल घडवून आणावेत, आणि केंद्र सरकारच्या कृषी खात्याच्या सहकार्याने निधी उपलब्ध करावा व यंदाच्या गळीत हंगामात संजीवनी सुरू करावी, अशी सूचना सुदिन ढवळीकर यांनी केली. 

दरम्यान, संजीवनी साखर कारखान्यांतर्गत सुमारे अकरा लाख चौरस मीटर जमीन आहे. या जमिनीचा योग्य वापर झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताला चालना दिली आहे. त्यामुळे गोव्यातही मुख्यमंत्री प्रमोद सावंत या उपक्रमासाठी अनुकूल असून संजीवनीच्या ताब्यात असलेल्या अतिरिक्त जमिनीवर दूध उत्पादन वाढीसाठी प्रकल्प उभारण्याची आवश्‍यकताही सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली. 

संजीवनीच्या अतिरिक्त जमिनीत गुरांचे विविध ठिकाणी नियोजनबद्धरीत्या जनावरांसाठी अद्ययावत सुविधांनी युक्त गुरांचे गोठे उभारून या गोठ्यांत गाई, म्हशी यांचे पालन करण्यासाठी ज्यांना आवड आहे, अशा किमान दहावी उत्तीर्ण युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. दूध उत्पादनासाठी गुरांना आवश्‍यक खावड तसेच इतर साहित्य पुरवणे, गुरांची देखभाल करणे अशा विविध कामांसाठी युवा वर्गाचा वापर झाल्यास त्यातून राज्यात दूध क्रांती होऊ शकते, आणि हे दूध गोवा डेअरी अथवा इतर डेअरींना देऊन गोवा दुधाच्याबाबतीत आत्मनिर्भरही होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

साडेनऊ कोटी खर्च का?
संजीवनी साखर कारखाना बंद ठेवून त्याबदली ऊस वाहतुकीसाठी साडेनऊ कोटी रुपये खर्च का म्हणून केले, असा सवाल सुदिन ढवळीकर यांनी केला. गेल्या हंगामात खानापूर येथील लैला साखर कारखान्याला गोव्यातील उसाचा पुरवठा करण्यात आला. मात्र हा पुरवठा करताना साडेनऊ कोटी रुपये खर्च करण्यात आला. संजीवनीची दुरुस्ती चार ते पाच कोटी रुपयात शक्‍य असताना खानापूरला ऊस पाठवून वाहतुकीसाठीच एवढ्या मोठा खर्च करण्यात आला. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करताना हा खर्च करण्यामागे कुणाचे डोके आहे, ते आधी शोधून काढा आणि अशा लोकांच्या खिशातूनच हे पैसे वसूल करा, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.

संबंधित बातम्या