रोजगारसंधी निर्माण केल्‍याबद्दल उपमुख्‍यमंत्र्यांचे अभिनंदन

गोमंतक वृत्तसंस्था
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी आता पर्यटनाचा सर्वांगीण विकास साधत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारे पर्यटन धोरण जाहीर केल्याबद्दल पेडणे मतदारसंघातील नगराध्यक्ष, सरपंच व माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी आजगावकर यांचे अभिनंदन केले आहे.

पेडणे : विद्यार्थ्यांना क्षणिक प्रगतीत उपयुक्त ठरलेले क्रीडा धोरण तयार करण्यात महत्त्‍वाची भूमिका बजावलेले उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी आता पर्यटनाचा सर्वांगीण विकास साधत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारे पर्यटन धोरण जाहीर केल्याबद्दल पेडणे मतदारसंघातील नगराध्यक्ष, सरपंच व माजी जिल्हा पंचायत सदस्यांनी आजगावकर यांचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री आजगावकर हे दूरदृष्टी असलेले राजकीय नेते असून राज्याला प्रगतीपथावर नेणारी धोरणे राबवणारे आजगावकर यांचा दूरदृष्‍टीपणा यातून स्पष्ट होतो, असे पेडण्याच्या नगराध्यक्ष श्वेता कांबळी, चांदेल - हसापूरचे सरपंच संतोष मळीक, कोरगावच्या सरपंच स्वाती गवंडी, खाजने अमेरे पोरस्कडेच्या सरपंच ग्लेन्सी परेरा, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष पांडुरंग परब व पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आजगावकर यांना पाठबळ देणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे. आजगावकर यांच्या धडाडीला मुख्यमंत्र्यांकडून मिळत असलेले प्रोत्साहन पूरक ठरत आहे, असे मत कांबळी यांनी व्यक्त केले आहे. पर्यटन धोरण जाहीर झाल्याने गोव्याच्या पर्यटन विकासाची दिशा स्पष्ट झाली आहे. त्यामुळे किनारी भागातील पर्यटनाबरोबरच निसर्ग, साहसी व आरोग्य पर्यटनालाही चालना मिळणार असून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. याचा लाभ किनारी भागासह अंतर्गत भागातील ग्रामीण जनतेलाही मिळणार आहे, असे श्री. मळीक यांनी सांगितले.

गोव्याची संस्कृती, खाद्य संस्कृती व जीवनशैलीचे जगभरच्या पर्यटकांना आकर्षण आहे. स्पष्ट पर्यटन धोरणामुळे पर्यटन व्यवसाय वृद्धी होणार आहे.आवश्यकता असेल तिथे सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वाचा अवलंब करून पायाभूत सुविधा व रोजगाराची निर्मिती करण्याचा निर्णयही स्तुत्य आहे,असे परेरा यांनी सांगितले.

आजगावकर यांच्याकडे मंत्रिपद असताना पर्यटन धोरण जाहीर झाले. दहा वर्षांपूर्वी क्रीडा धोरण त्यांनी जाहीर केले होते. क्रीडा धोरणाबद्दल वेगवेगळे वाद - प्रवाद होते. पण, आजगावकर यांनी टीकेला न जुमानता दूरदृष्टी दाखवनू क्रीडा धोरण पुढे नेले. याचा लाभ आज हजारो विद्यार्थ्यांना मिळत आहे, असे श्री. परब यांनी सांगितले. या धोरणामुळे खेळाकडे पाहण्याच्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाला आहे. याचे श्रेय आजगावकर यांना जाते असे श्री. गावस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या