म्हापशातील सभागृहाच्या हिशेबाला मान्यता द्यावी

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

म्हापशातील भंडारी समाज सभागृहाचे बांधकाम पारदर्शक पद्धतीने झाले आहे. कोणतीही अफरातफर झालेली नाही, असे अस्थायी समितीला आढळून आले आहे.

थिवी: म्हापशातील भंडारी समाज सभागृहाचे बांधकाम पारदर्शक पद्धतीने झाले आहे. कोणतीही अफरातफर झालेली नाही, असे अस्थायी समितीला आढळून आले आहे. त्यामुळे या सभागृहाच्या हिशेबाला मान्यता द्यावी आणि नंतरच पुढील कामकाज करावे, अशी मागणी बार्देशमधील भंडारी ज्ञाती बांधवांच्या बैठकीत काल (शनिवारी) करण्यात आली.

बार्देश तालुका अस्थायी समितीतर्फे तालुक्यातील ज्ञातिबांधवांची बैठक पार पडली. केंद्रीय समितीकडून सभागृहाच्या दरवाजाला कुलूप लावल्यामुळे ही बैठक सभागृहाच्या बाहेर खुल्या जागेत घेण्यात आली. अस्थायी समितीचे निमंत्रक उल्हास अस्नोडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सुधीर कांदोळकर यांच्या कार्यपद्धतीत काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही, सभागृह बांधकामाचा हिशेब चोख आहे, असे मत सर्वांनी यावेळी व्यक्त केले.
सभागृहाचे बांधकाम योग्य तऱ्हेने झाले आहे, असे अस्थायी समितीला आढळून आले आहे. त्यामुळे सुधीर कांदोळकर यांच्या विरोधात केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही, असा दावा बैठकीत करण्यात आला.

या वेळी उल्हास अस्नोडकर म्हणाले, सभागृहाचे बांधकाम सुरू असताना कुणीही हरकत घेतली नाही अथवा आरोप केला नाही. बांधकाम पूर्ण झाल्यावर केलेले आरोप वस्तुस्थितीला धलन नाहीत, त्यामुळे ते मान्य करण्यात आलेले नाहीत. जर हिशेबात काही गफलत असल्याचा कोणाला संशय वाटत असेल तर त्याची खास समितीमार्फत चौकशी करता येते, परंतु हिशेबाला मान्यता न देता तो विषय तसाच प्रलंबित ठेवणे योग्य नाही. सभागृहाच्या बांधकामावर प्रति चौरस साडे अठरा हजार रुपये खर्च आलेला आहे. ज्या व्यक्तींना तो खर्च जास्त वाटत आहे, त्यांनी सध्याच्या व तेव्हाच्या दराची माहिती जाणून घेतल्यास तथ्य कळून येईल. त्यामुळे या वादावर पडदा टाकणेच योग्य आहे, असे ते म्हणाले. तसेच अस्थायी समितीचे चौकशी करण्याचे काम पूर्ण झाले झाले असून, ती समिती बरखास्त केली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.

श्री. अस्नोडकर पुढे म्हणाले, की ज्ञातिबांधवांकडून समाजाचे चांगले होणारे कार्य काही लोकांच्या डोळ्यांत खुपते. समाज एकसंध असला तरच प्रगती साध्य होईल. त्यासाठी सर्वांनी समाजासाठी एकत्र यावे. आपली मते वेगळी असू शकतात, परंतु समाज एक असायला हवा. आपण पदाधिकारी बनावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाला योगदान देता यावे म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्रत्येकाला मिळायला हवी. कालानुरूप संस्थेच्या घटनेत दुरुस्ती करायला हवी. आवश्‍यक बदल हे व्हायलाच हवेत. कोणाला हे बदल पटत नसतील तर त्यांनी पर्याय सुचवायला हवा. योग्य वेळी योग्य ते बदल करणे हे समाजाच्या हिताचे ठरेल. समाजातील सुशिक्षितांनी अशा चांगल्या गोष्टींसाठी पुढाकार घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. बैठकीत सदानंद कौठणकर, सुभाष कवठणकर, जयवंत नाईक, संजय नाईक, रंजन मयेकर आदींनी मतप्रदर्शन केले.  

उद्या रविवारी होणाऱ्या बार्देश तालुका ज्ञातिबांधवांच्या बैठकीत केंद्रीय समितीकडून नव्या समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. या बैठकीत ज्ञातिबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच प्रथम सभागृह हिशेबाला मंजुरी द्यावी व त्यानंतरच समितीची नियुक्ती करण्यात यावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

संबंधित बातम्या