मडगावात सशस्त्र पोलिसांचा पहारा

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सुरक्षा व्यवस्था कडक; व्यापारीही सतर्क

मडगाव: सराफी व्यावसायिक स्वप्नील वाळके यांच्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती मडगावमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून व्यापाऱ्यांनीही स्वतःच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. 

खुनाच्या घटनेनंतर व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. मडगावच्या मध्यवर्ती भागात असलेल्या न्यू मार्केटमध्ये पोलिस गस्त वाढवण्यात आली असून दिवसरात्र सशस्त्र पोलिस पहारा ठेवण्यात आला आहे. 

पोलिस महासंचालक मीना यांनी गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशन व मार्केटमधील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुरक्षा व्यवस्थेसंबंधी गुरुवारी बैठक घेतली होती. या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. पोलिस व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने सुरक्षा यंत्रणा उभारण्याबाबतही चर्चा झाली असे गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमित रायकर यांनी सांगितले. 

खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सशस्त्र सुरक्षा पुरवण्यात येत असली तरी काही दिवसांनी ही सुरक्षा व्यवस्था बंद होऊ नये. मार्केट परिसरात सुरक्षा व्यवस्था निरंतर सुरु राहावी अशी आमची मागणी असल्याचे रायकर यांनी सांगितले. 

असोसिएशनतर्फे एक सुरक्षा बुथ आधीच पोलिसांना देण्यात आला आहे. मडगाव पालिका इमारतीजवळच्या चौकात हा बूथ बसवण्यात आला आहे. आणखी दोन बूथ पोलिसांना देण्याचा प्रस्ताव आहे. सराफी व्यावसायिकांसह मार्केटमधील इतर व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हे सुरक्षा बूथ लाभदायक ठरतील. या बूथमधून सशस्त्र पोलिस पहारा करू शकतील. असे रायकर यांनी सांगितले.   

दिवसाढवळ्या घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे मडगावमधील व्यापारी वर्ग सतर्क झाला असून व्यापाऱी आपली दुकाने व आस्थापनांच्च्या सुरक्षेत सुधारणा करत असल्याचे दिसून येत आहे. 

सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याकडे दुर्लक्ष केलेले दुकानदार ही यंत्रणा बसवण्याच्या तयारीला लागले आहेत. तर ही यंत्रणा असलेले  दुकानदार त्यात सुधारणा करू लागले आहेत.

संबंधित बातम्या