शाळा, विद्यालये सुरू करणार पण वाहतुकीचे काय, खाण भागात समस्या !

विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था करा, खाण कंपन्यांना आदेश द्या.
शाळा, विद्यालये सुरू करणार पण वाहतुकीचे काय, खाण भागात समस्या !
School Dainik Gomantak

पाळी : गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा (School closed for a year and a half), विद्यालये आता सुरू करण्यावर सरकारने भर दिला असून येत्या आठवड्यात शाळा, विद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे. दीड वर्षांनंतर विद्यार्थी (Students) शाळा विद्यालयांत पाय ठेवणार असले तरी खाणव्याप्त दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने उपलब्ध होण्यासंबंधी अनिश्‍चितता असून खाण (Mining companies) भागातील विद्यार्थ्यांची वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी खाण अवलंबितांकडून करण्यात येत आहे.

राज्यात विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी सरकारने बालरथांची व्यवस्था केली आहे. मात्र हे बालरथ गेले दीड वर्ष बंदच आहेत. त्यातील काही बालरथ गंजण्याच्या मार्गावर आहे तर काहींची निगा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे बालरथ आधी दुरुस्त करून रस्त्यावर आणण्यायोग्य करण्याची गरज आहे. बालरथांप्रमाणे खाण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी काही खाण कंपन्यांनी खाजगी वाहने उपलब्ध करून दिली होती. त्यात बसगाड्या तसेच जीपगाड्यांचा समावेश होता. मात्र 2018 मध्ये दुसऱ्यांदा खाणी बंद झाल्यानंतर या खाण कंपन्यांनी ही वाहनेच बंद केली, त्यामुळे खाण भागातील विद्यार्थ्यांची अतिशय अडचण झाली होती.

नंतरच्या काळात कोरोनाची महामारी आल्याने शाळा, विद्यालये बंदच राहिली. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न उपस्थित झाला नाही. मात्र आता कोरोना नियंत्रणात असल्याने सरकारने (Government) शाळा (School), विद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्यात जमा आहे. त्यामुळे खाण भागातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होणार आहे. सरकारने याप्रकरणी त्वरित लक्ष घालून खाण कंपन्यांनी बंद केलेली ही वाहने त्वरित सुरू करण्यासाठी संबंधित खाण कंपन्यांच्या व्यवस्थापनाना आदेश द्यावेत आणि खाण भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

खाण कंपन्यांनी कमावले-

राज्यात 2012 व त्यानंतर 2018 मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार खाणी बंद करण्यात आल्या. मात्र लीलावाचा खनिज माल तसेच स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची वाहतूक मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. आताही खाण लीजच्या बाहेर असलेल्या खनिज मालाची वाहतूक करण्यात येणार आहे. खाणी बंद झाल्या तरी या खाण कंपन्यांनी बक्कळ कमावले, पण सामाजिक जबाबदारी मात्र झटकली. त्यामुळे आता लीजच्या बाहेर असलेल्या खनिज मालाची वाहतूक सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या तसेच खाणींवर प्लांट तसेच इतर मशिनरी सुरू ठेवलेल्या या खाण कंपन्यांना विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था करण्यासाठी सरकारने आदेश देण्याची गरज आहे.

तुटपुंजे सहाय्य तेही अर्धवट-

वास्तविक राज्यातील सर्वांत मोठा उद्योग हा खाण व्यवसाय असून गेली सत्तर वर्षे हा उद्योग सुरू आहे. अंदाधुंदीमुळे या उद्योगावर गंडांतर आले. खाण व्यवसायातून खाण मालकांनी करोडो रुपये कमावले. खाणी अवलंबितांना मात्र सहाय्याचे गाजर दाखवण्यात आले. तुटपुंज्या सुविधा खाण भागात या खाण कंपन्यांनी दिल्या आणि खाणी बंद झाल्यानंतर त्या लगेच बंद केल्या.

विशेष म्हणजे शैक्षणिक सुविधा बंद करून खाण मालकांनी बेजबाबदार असल्याचेच सिद्ध केले. खाणी सुरू होत्या त्यावेळेला लोकांना रोजगार मिळाला, खाणी बंद झाल्या आणि लोकांवर भीक मागण्याची पाळी आली. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. मात्र त्यानंतर लीलावाचा आणि स्वामित्व धन अदा केलेल्या खनिज मालाची वाहतूक करून पुन्हा करोडो रुपये कमावले आणि खाण अवलंबितांच्या तोंडाला पाने पुसली.

शैक्षणिक सुविधा हव्यात-

खाण भागात तुटपुंज्या शैक्षणिक सुविधा असल्याने उच्च शिक्षणासाठी खाण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात पाठवावे लागले. मात्र त्यासाठी लागणारा पैसा खाण अवलंबितांकडे नसल्याने आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरच आफत आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.

- राजाराम शिवा गावकर (एक पालक, तिस्क - उसगाव)

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-

खाण भागाचे प्रतिनिधीत्व करणारे डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना खाण भागातील लोकांच्या समस्यांची जाणीव आहे. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेऊन खाण कंपन्यांना वाहतूक सुविधा पूर्ववत सुरू करण्यासाठी आदेश द्यायला हवेत.

- अनील जगन्नाथ नाईक (एक पालक, होंडा)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com