हल्लेखोरांसह सूत्रधाराला अटक करा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

पंचवाडी - शिरोडा येथील कार्यक्रमावेळी म्हादईप्रकरणी आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते ॲड.ह्रदयनाथ शिरोडकर व इतरांविरुद्ध काही गुंडप्रवृत्तींकडून झालेल्या हल्ल्याचा ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’ने निषेध केला आहे. त्याला सरकारविरोधी विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शविला. हल्लेखोरांसह त्यामागील सूत्रधाराला अटक करण्याची व सखोल चौकशीची मागणी शिष्टमंडळाने पोलिस महासंचाक मुकेश कुमार मीणा यांना निवेदन देऊन केली. 

पणजी : पंचवाडी - शिरोडा येथील कार्यक्रमावेळी म्हादईप्रकरणी आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते ॲड.ह्रदयनाथ शिरोडकर व इतरांविरुद्ध काही गुंडप्रवृत्तींकडून झालेल्या हल्ल्याचा ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’ने निषेध केला आहे. त्याला सरकारविरोधी विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शविला. हल्लेखोरांसह त्यामागील सूत्रधाराला अटक करण्याची व सखोल चौकशीची मागणी शिष्टमंडळाने पोलिस महासंचाक मुकेश कुमार मीणा यांना निवेदन देऊन केली. 

ॲड. ह्रदयनाथ शिरोडकर हे शिरोडा येथील एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी गेले असता तेथील आयोजकांसह त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी असलेल्या दोन तरुण व एका महिलेने हा हल्ला केला. या हल्ल्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. हल्लेखोर हे गुंडप्रवृत्तीचे असल्याने पोलिसांनीही धाडस केले नाही. याप्रकरणी पोलिस तक्रार दिल्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरी फोंडा पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली नाही. हा हल्ला करण्यामागे कोण आहे व तो सुपारी देऊन करण्यात आला आहे याची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

या हल्ल्याचा निषेध करण्यामध्ये काँग्रेसचे संकल्प आमोणकर व ॲड. वरद म्हार्दोळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बर्डे, गोवा सुरक्षा मंचचे शैलेंद्र वेलिंगकर, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत व संतोष सावंत, पर्यावरवप्रेमी व इतिहास अभ्यासक प्रा. प्रजल साखरदांडे उपस्थित होते. या सर्वांनी ॲड. शिरोडकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करून हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. या घटना निंदनीय असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे तसेच हल्लेखोरांना अटक करण्यास होत असलेला उशिरामुळे भाजप सरकार त्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

यावेळी ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’चे महेश म्हांबरे म्हणाले की, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी प्रकरणाची माहिती असून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमागे कोण सूत्रधार आहेत त्याचा तपास करण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे. सरकारविरोधात आवाज उठविणाऱ्यांचे खच्चीकरण करण्याच्या व हल्ल्याच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून त्याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे त्या दृष्टीने पोलिसांनी कडक पावले उचलण्याचीही विनंती करण्यात आली. या हल्‍ला आग्नेल फर्नांडिस, ब्रुनो डिसोझा व त्याच्या पत्नीने केला आहे याची माहितीही पोलिसांना देण्यात आली आहे मात्र अजूनही फोंडा पोलिसांना कारवाई न करता फक्त त्यांना पोलिस स्थानकात बसवून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे म्हांबरे यांनी सांगितले.  केंद्र व राज्यातील विषयांविरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न अशा प्रकारे हल्ला करून लक्ष्य बनविण्याचे सुरू झाले आहे. ॲड. शिरोडकर हे म्हादईप्रश्‍नी आवाज उठवित आहे म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला असण्याची शक्यता आहे त्यामुळे या हल्लेखोरांमागील सूत्रधाराचा शोध घेणे आवश्‍यक असल्याचे प्रा. प्रजल साखरदांडे म्हणाले. या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. सरकार समाजकंटकांना पाठिंबा देत आहे म्हणून अजूनही हल्लेखोरांना अटक होत नाही असे गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत म्हणाले. 

सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच बिगर सरकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ले होऊ लागले आहे ही गंभीर बाब आहे. विनाशकारी प्रकल्पाबाबत राज्यातील लोक जागृत होत आहेत. त्याचे होणारे दुष्परिणाम याची माहिती लोकांसमोर मांडत आहेत त्यामुळे सरकारवर दबाव येतो. हा दबाव मोडून काढण्यासाठी अशी कृत्ये सरकारकडून समाजकंटकांना पुढे काढून केले जात आहे अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष मतभेद विसरून एकत्रित आले आहेत. हे सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. सरकारने लोकांवर दबाव आणून स्वतंत्र हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बर्डे म्हणाले.

संबंधित बातम्या