विविधतेने नटलेल्या गोव्यात परदेशी पक्षांचे आगमन

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

निसर्गाच्या विविधतेने नटलेले गोवा हे राज्य. राज्याच्या सौंदर्यात येथील समुद्रकिनारे जितकी भर  घालतात तितकाच येथील परिसरही. देवदेवतांची पूण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात परदेशी व्यक्ती लगेच प्रेमात पडते

पणजी : निसर्गाच्या विविधतेने नटलेले गोवा हे राज्य. राज्याच्या सौंदर्यात येथील समुद्रकिनारे जितकी भर  घालतात तितकाच येथील परिसरही. देवदेवतांची पूण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात परदेशी व्यक्ती लगेच प्रेमात पडते आणि गोव्याचे सौंदर्य कुणी कॅमेऱ्यात बंदिस्त करतो, तर कुणी मनाच्या कप्प्यात आठवणीचा गाठोडे घेऊन जातो. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने माणसांप्रमाणेच आता परमुलुखातून राज्यातील विविध भागात आलेले पक्ष्यांचे थवेच्या थवे दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे या पक्ष्यांचे आगमन झाल्याने हिरवाईत आणखीनच भर पडली आहे. 

राज्यातील हिरव्यागार वनराईत आणि पाणथळी आदी ठिकाणी अनेक पक्षी विसावलेले असल्याचे निरीक्षण पक्षीमित्र नोंदवत आहेत. याशिवाय मोरजी आणि आगशी येथील पाणस्थळी किनारी पक्षी चांगल्या संख्येत दिसून येत असून पक्षीनिरीक्षक त्यांना कॅमेऱ्यात टिपत आहेत.  

यावर्षी जॅक स्नाय्प आणि ऑर्फीयन वार्बलर यासारखे दुर्मिळ पक्षी पक्षीनिरीक्षण करणाऱ्या जुस्तीन रिबेलो यांनी कॅमेराबद्ध केले आहेत. सीगल्सचे विविध प्रकार निरीक्षणास येत आहेत. ब्राऊन हेडेड गल्स, हिउग्लीन्स गल्स आणि स्टेप गल्स चांगल्या संख्येत दिसत आहेत. ग्रेटर-क्रेस्टेड टर्न्स, लेसर-क्रेस्टेड टर्न्स, गल-बील्ड टर्न्स आणि कॉमन टर्न्स यासारख्या टर्न्सच्या प्रजातीसुद्धा पाहायला मिळत आहेत. करमळी तालवानजीक तर पक्षांचे दर्शन होतेच आहे पण याशिवाय कुडतरी तलावाच्या परिसरात पक्षांची चांगली संख्या दिसून येत असल्याचे मंदार भगत म्हणाले. यावर्षी चांगल्या संख्येत पक्षी आले असल्याचे निरीक्षणसुद्धा नोंदविले जात आहेत. परदेशी पक्षांमध्ये काही दुर्मिळ प्रजातीसुद्धा दृष्टीस पडत आहेत. गोव्यासाठी जरासा दुर्मिळ असणारा क्रॅब फ्लोवरसुद्धा मोरजी येथे दिमाखात वावरताना पहायला मिळत आहे. मायना- कुडतरी येथे पक्षांची संख्या मोठया प्रमाणात दिसत आहेत. 

राज्यातील विविध तळ्यांमध्ये बदकांना पहायला मिळत आहेत. कसलेल्या शेतात छोटे किटक खायला येणारे वूड सॅण्डपायपर, मार्श सॅण्डपायपर, लिटल स्टींट, टॅमींक स्टींट, रींग्ड प्लोवरसारखे पक्षी दिसत आहेत. किनारी भागामध्ये अमूर फाल्कन पक्षी नजरेस पडतो आहे. हा पक्षी चीनमधील अमूर भागातून आफ्रिकेच्या दक्षिण भागापर्यंत प्रवास करतो. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरुन समुद्रावर अंतिम झेप घेण्याआधी हे पक्षी थांबतात आणि आफ्रिकेत पोहोचेपर्यंत एकसारखे उड्डाण करत असल्याची माहिती भगत यांनी दिली. 

तसेच गार्गनी ,नॉर्दर्न पनवेल, नॉर्दर्न शावेलर, कॉटन पीग्मी टील मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जंगलांमध्ये दिसणाऱ्या पक्षांमध्ये ग्रीन वार्बलर इंडियन ब्लु रॉबीन, वर्डीटर फ्लायकेचर, ब्राऊन ब्रेश्टेड फ्लायकेचर, एशियन ब्राऊन फ्लायकेचर आणि रेड-ब्रेश्टेड फ्लायकेचर हे पक्षी दृष्टीस पडत असल्याचे भगत म्हणाले. 

संबंधित बातम्या