म्हापशात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

म्हापशातील श्री बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात हा तलाव उभारण्यात आलेला आहे. पुणे-मुंबईत अशा स्वरूपाचे कृत्रिम तलाव असले, तरी गोव्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

म्हापसा: म्हापसा रोटरी क्लब, म्हापसा नगरपालिका, म्हापसा रोटरॅक्ट क्लब आणि जेसीआय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून म्हापसा शहरात सध्या गणेशविसर्जनासाठी कृत्रिम तलाव साकार झाला आहे. तार नदी प्रदूषित झाल्याने अशा स्वरूपाचा तलाव बांधण्यात यावा, अशी मागणी काही पर्यावरणप्रेमींनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हापसा पालिकेसमोर सातत्याने केली होती. म्हापशातील श्री बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात हा तलाव उभारण्यात आलेला आहे. पुणे-मुंबईत अशा स्वरूपाचे कृत्रिम तलाव असले, तरी गोव्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

८०० मूर्तींची विसर्जन क्षमता
या तलावाची लांबी वीस मीटर, रुंदी सात मीटर तर खोली चार फूट आहे. यंदा या तलावात सुमारे सातशे ते आठशे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सोय केली आहे. म्हापसा पालिकेने गणेश विसर्जनासाठी प्रभागनिहाय वेळापत्रक तयार केले असून, त्याची काटेकोर कार्यवाही पालिकेच्यावतीने केली जाईल, असे पालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या तलावात पाणी साठावे यासाठी भूभागावर प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले असून, सर्व बाजूंनी बॅरिकेट्‍स उभारण्यात आली आहेत. 

संजय बर्डे यांनी दिली तलावासाठी जमीन
म्हापसा येथील तार नदीचे दिवसेंदिवस प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हापसा शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी एखादा कृत्रिम तलाव उभारण्यात यावा यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा, ही मागणी म्हापसा यूथ ग्रूपचे प्रवीण आसोलकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने बैठका, पत्रकार परिषदा वगैरे आयोजित करून पुढे रेटली होती. अखेरीस म्हापसा येथील बोडगेश्वर शेतकरी संघटनचेचे अध्यक्ष संजय बर्डे यांच्या मातोश्रींनी स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीसंदर्भात ‘ना हरकत दाखला’ दिल्यानंतर या तलावाचे काम पूर्ण झाले, अशी माहिती म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी दिली.  

याच कृत्रिम तलावात भाविकांनी मूर्तींचे विसर्जन करावे असे बंधनकारक नाही. ती मंडळी तार नदीतही विसर्जन करू शकतात, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. 

विसर्जनासाठी नावनोंदणीचे आवाहन
भाविकांनी या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासंदर्भात नावनोंदणी करणे आवश्यक आहे. तलावाच्या ठिकाणी उपलब्ध असलेले रोटरी क्लबचे स्वयंसेवक गणेशमूर्तींचे विसर्जन करतील, असे म्हापसा रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजित वाळके यांनी स्पष्ट केले आहे. या तलावाच्या बांधकामासाठी पालिकेच्यावतीने यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती, तर प्लास्टिकचे आवरण घालणे, बॅरेकेट्‍सची उभारणी, विद्युत व्यवस्था इत्यादी अन्य खर्च रोटरी क्लब व अन्य संस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. सध्या या तलावासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च आल्याचे अभिजित वाळके यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या