अखिल गोवा मराठी शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी अरविंद सायनेकर

dainik Gomantak
रविवार, 5 जुलै 2020

अखिल गोवा मराठी शिक्षक संघाची स्थापना करण्यात येऊन अध्यक्षपदी अरविंद सायनेकर यांची निवड करण्यात आली. मराठी अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनाही संघटनेत सामावून घेणार असल्याचे यावेळी अरविंद सायनेकर यांनी सांगितले.

पेडणे
यावेळी निवडण्यात आलेले इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे - उपाध्यक्ष- गोपाळ सावंत, खजिनदार- राजमोहन शेटये,
उपखजिनदार- अनिल पिळर्णकर, सचिव - सौ. प्रिया टाकसाळे, सहसचिव - देवेंद्र साठे, कार्यकरी सभासद - सौ. वेदश्री पित्रे, सौ. वर्षा चोडणकर, प्रशांत मांद्रेकर, विनोद पित्रे, विजय शेट मांद्रेकर, शशिकांत कोरगावकर, सौ. आशालता मिशाळ व संदीप गावस.
अरविंद सायनेकर यावेळी म्हणाले, की मराठी भाषेला राजवैभव आहे. गोमंतकात कोकणी आणि मराठी भाषेला समान दर्जा आहे. तसेच गोवा शालान्त मंडळाच्या अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय अशा निवडीत अनेक विद्यार्थी या विषयात आपली निवड सिध्द करतात. पेडणे डिचोली, सत्तरी, फोंडा, सांगे ते काणकोणपर्यंत या भाषेचे चाहते आहेत. ही भाषा किती समृध्द आहे व गोमंतकीय समाजजीवनात किती अढळ आहे याची साक्ष देतात. आपण मराठी जोपासली पाहिजे. कितीही आंदोलने आणि जागृती केली, तरी खऱ्या अर्थाने मराठी भाषा जोपासली आहे ती मराठी विषयाच्या शिक्षकवर्गाने. अन्य भाषांचा चाललेला उदो उदो पाहता मराठी भाषा आपल्या मातीशी प्रामाणिक राहूनसुद्धा बाजूला पडली आहे. या पार्श्वभूमीवर काही समविचारी शिक्षकांनी एकत्र येऊन अखिल गोवा मराठी शिक्षक संघाची मुहूर्तमेढ रोवली आहे. मराठी भाषेला अग्रस्थानी मानून या भाषेला समृध्द करणाऱ्या सर्व मराठी शिक्षकांना वेगवेगळे उपक्रम राबवणे, भाषेसंबंधी अभ्यास करणे, शिक्षकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर ठोस भूमिका घेणे व या विषयाला न्याय देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करणे अशी अनेक उद्दिष्टे संघाने ठेवली आहेत, असे अरविंद सायनेकर म्हणाले. राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच विना अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीसाठी मराठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही या संघटनेत सामावून घेण्याचा विचार आहे.

संबंधित बातम्या