अस्नोडा पार नदीच्या पुलाकडे दुर्लक्ष नको

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

गोवा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाची ठळक आठवण असलेल्या अस्नोडा पार नदीवरील पुलाचे तातडीच्या दुरुस्तीसह पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची शासनाकडे आग्रही मागणी आहे.

अस्नोडा: गोवा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाची ठळक आठवण असलेल्या अस्नोडा पार नदीवरील पुलाचे तातडीच्या दुरुस्तीसह पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची शासनाकडे आग्रही मागणी आहे.
अस्नोडा येथील पार नदीवरील पुलाच्या पदपथावर शासकीय खात्यांनी केलेले अतिक्रमण, कठड्याच्या लोखंडी बाजू गंजल्यामुळे मोडकळीस आलेला पुलाचा संरक्षक कठडा, पुलावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे वाहन चालकांना करावी लागणारी कसरत आणि पुलाच्या वेळोवेळच्या डागडुजीकडे शासनाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष या गोष्टी॑मुळे गोवा मुक्तीसंग्रामातील ऐतिहासिक आठवण असलेल्या अस्नोडा पुलाची रया पार गेलेली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांमधील वाहतुकीच्या माध्यमाचा महत्त्वाचा दुवा असलेल्या अस्नोडा पुलाची तातडीची दुरुस्ती करून या ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे अशी आग्रही मागणी आहे. मुक्तीसंग्रामातील ऐतिहासिक घटना खंडप्राय भारतदेशाचा चिमुकला भाग असलेल्या गोव्यावर पोर्तुगीजांची जुलमी हुकमत होती. १९ डिसेंबर १९६१ या दिवशी प्रदीर्घकाळ चाललेल्या गोवा मुक्ती संग्रामाची इतिश्री झाली. गोवा मुक्तीच्या पूर्वसंध्येला गोव्यात दाखल होणाऱ्या भारतीय सेनेला थोपविण्यासाठी पोर्तुगीजांनी अस्नोड्याचा पूल उडविला.

दुर्मिळ जांभ्या दगडांच्या फिचारणीचा सात कमानी असलेल्या या पुलाखाली दोन ट्रक मावतील इतके स्फोटक आरडीएक्स रचून ठेवण्यात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोन प्रचंड स्फोट घडवून अस्नोड्याचा पूल उडविण्यात आला. स्फोटांचा दणका इतका भयानक होता की पाच कि. मी. चा परिसर हादरला आणि स्फोटांमुळे पुलाच्या जागी दोन प्रचंड खंदक निर्माण झाले.  पोर्तुगीज अशी काही आगळीक करतीलच हे गृहित धरून पूर्वतयारीनिशी आलेल्या भारतीय सेनेच्या जवानांनी खंदकांच्या खालच्या बाजूने पाण्यात रेतीच्या पिशव्या रचून तात्पुरता रस्ता तयार केला.त्यावरून सेनेच्या वाहनांनी नदी पार केली आणि १९ डिसेंबरच्या पहाटे राजधानी पणजीत भारताचा तिरंगा फडकाविला. मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेऊन तातडीने उद्ध्वस्त झालेल्या अस्नोड्याच्या पुलाची उभारणी केली होती.

संबंधित बातम्या