काणकोण पालिका क्षेत्रांतर्गत डांबरीकरणाचा धडका

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

काणकोण पालिका क्षेत्रात अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीचा व हॉटमिक्स डांबरीकरणाचा धडका उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या प्रयत्नातून सुरू झाला आहे. भाजपने चार खात्याचे धनी असलेले मंत्री काणकोणला दिले.

काणकोण : काणकोण पालिका क्षेत्रात अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीचा व हॉटमिक्स डांबरीकरणाचा धडका उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या प्रयत्नातून सुरू झाला आहे. भाजपने चार खात्याचे धनी असलेले मंत्री काणकोणला दिले. त्यावेळी सुवर्णकाळ होता. निधीची चणचण नव्हती.

पर्यटन व खाण व्यवसायातून राज्याला बऱ्यापैकी महसूल प्राप्ती होत होता. अशा काळात काणकोणात विकासकामांची गंगा वाहणे गरजेचे होते. मात्र, काणकोणच्या नशिबी ते भाग्य आले नाही. आता निधीची चणचण असूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काणकोणमधील विकासकामांना मंजुरी देत आहेत. ते काणकोण व माझे भाग्य असल्याचे मत उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी पालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या विकासकामांचा शुभारंभ करताना सांगितले.

देळे येथे नारळ वाढवून त्यांनी रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणास प्रारंभ केला. नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्थानिक नगरसेवक किशोर शेट, भाजप मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, नगरसेवक श्‍यामसुंदर नाईक देसाई, तसेच धिरज नाईक गावकर, विशाल देसाई उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक किशोर शेट यांनी उपसभापती फर्नांडिस हे विकास पुरुष आहेत. त्यांच्या कामाचा धडाका थक्क करणारा आहे. ज्या ठिकाणी विकास आहे, त्यालाच जनता आपली पहिली पसंती देतात. विकासकामे करणाऱ्यांच्या मागे मी व आपल्या वार्डातील जनता सदैव राहणार आहे.

श्‍यामसुंदर नाईक देसाई व विशाल देसाई यांनी पालिका क्षेत्रातील वेवेगळ्या समस्यांविषयी उपसभातींकडे चर्चा केली. पाळोळे येथे १ लाख ५१ हजार रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात येणार आहे. ओव्हरे येथे ९ लाख ६८ हजार रुपये खर्चून डांबरीकरण, पाटणे येथे १८ लाख ८२ हजार रुपये खर्चून हॉटमिक्स डांबरीकरण, पणसुले - शिंगाळे रस्त्याचे ४० लाख ६८ हजार व देळे रस्त्याचे ४१ लाख २८ हजार रुपये व सकरेव्हाळ रस्त्याचे २८ लाख रुपये खर्चून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. देळे येथे संगीता शेट यांनी फुले देऊन उपसभापतींचे स्वागत केले. दिलखुश शेट यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित बातम्या